राजवाडी कांगापूर येथील नदीपात्रात मगरीचा वावर
राजापूर : तालुक्यातील राजवाडी कांगापूर येथील लोकवस्तीपासून काही अंतरावरून वाहणार्या नदीपात्रामध्ये येथील ग्रामस्थ किरण बंडबे यांना गेल्या महिन्यामध्ये मगर आढळून आली. गेल्या महिनाभरापासून सातत्याने येथील ग्रामस्थांना ती दिसते आहे. ती सुमारे चार फूट लांबीची आहे. या मगरीमुळे तालुक्यामध्येही मगरींचा वावर असल्याची पहिल्यांदा नोंद झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी वन विभागाचे वनरक्षक सागर गोसावी आणि ग्रामस्थांसमवेत मगरीचा वावर असलेल्या परिसराची पाहणी केली. कांगापूर येथील नदीपात्रामध्ये मगरीचा वावर असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेकवेळा नदीपात्रामध्ये मगरीचे लोकांना दर्शनही होते. या नदीपात्रामध्ये विविध कारणांनिमित्ताने लोकांचा नियमित वावर असतो. नदीपात्रामध्ये आढळलेली मगर लगतच्या खोल डोहामध्ये वावरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही मगर नेमकी कशी आणि कुठून आली, त्या ठिकाणी पूर्वीपासून तिचे वास्तव्य होते का ? आदी प्रश्न सार्यांना पडले आहेत. या मगरीपासून लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही मगर पकडून वन विभागाने अन्यत्र सुरक्षित ठिकाणी तातडीने सोडावी, अशी मागणी श्री. नागले यांनी वनविभागाकडे केली आहे.