खेडमध्ये मान्सूनचे दमदार आगामन अचानक जलधारा बरसू लागल्याने नागरिकांची तारांबळ
खेड :गेले अनेक दिवस अबालवृद्ध ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ते वरुणाचे आज अखेर दमदार आगामन झाले. दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान आकाशात ढग जमा झाले आणि बघता बघता जलधारा बरसू लागल्या. अचानक आलेल्या पावसामुळे घरातून विनाछत्री बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काहींनी पहिल्या पावसात मनसोक्त भिजणे पसंत केले तर काहींनी मिळेल तो आसरा शोधत पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
या वर्षी मार्च महिन्यापासूनच वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. मे महिन्यात तर आतापर्यंतच्या तापमानाचे रेकॉर्ड मोडीत निघाले होते. वातावरण इतके तप्त झाले होते कि, सकाळी दहा वाजल्यानंतर घरातून बाहेर पडणेही अशक्य झाले होते. ग्राहकांची प्रचंड गर्दी असणारे मार्केटमधील रस्त्यांवर दहा अकरा वाजताच शुकशुकाट पाहावयास मिळत होता. उकाड्याने हैराण झालेले नागरिक कधी एकदा पाऊस येतो याकडे नजर लावून बसले होते.
हवामान खात्याच्या वतीने यावर्षी २८ मे रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अलीकडे हवामान खात्याचे अंदाज चुकत नसल्याने हवामान खात्याने दिलेल्या तारखेलाच मान्सूनचे आगमन होईल आणि वातावरणात शिथिलता येईल असा विश्वास नागरिकांना होता मात्र यावेळी हवामान खात्याचा मान्सूनबाबतचा अंदाज चुकला आणि कोकणात मान्सून दाखल व्हायला १० जून पर्यंत वाट पाहावी लागली.
आज सकाळी नेहमीप्रमाणेच तापमान कमालीचे तापलेलेहोते. तळपत्या सूर्याला डोक्यावर घेत रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत आकाशात पावसाची कोणतीही चिन्ह नव्हती. त्यामुळे पाऊस आणखी किती काळ वाट पाहावयाला लागणार याची चर्चा सुरु होती मात्र दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि बघता बघता आकाशातून जलधारा बरसू लागल्या. सुमारे पाऊण तास जलधारा बरसतच होत्या. सकाळी पावसाची कोणतीही चिन्ह नसल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी छत्री आणि दुचाकीस्वरांनी रेनकोट सोबत घेतले नव्हते. त्यामुळे पाऊस सुरु होताच विनाछत्री नागरिक आणि विनारेनकोट दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. मार्केटमध्ये आलेल्या काही ग्राहकांनी पहिला पाऊस अंगावर घेत पहिल्या पावसाची मजा लुटली तर काहींनी मिळेल तिथे आसरा घेत पावसापासून बचाव केला.
लांबलेल्या पावसाचे अखेर आज अखेर आगमन झाल्याने गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागिरकांना दिलासा मिळाला आहे. आज पावसाचे आगमन होताच बच्चे कंपनीला झालेला आनंद अवर्णनीय होता. पाऊस सुरु होताच बच्चे मंडळीने पहिला पाऊस अंगावर घेत पहिला पाऊस एन्जॉय केला.