जिल्ह्यातील दहा गावे होणार ‘लखपती’
रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ‘लखपती’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 10 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे. पुढील 10 वर्षासाठी 210 कोटी 41 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे या गावांचा कायापालट होणार आहे.
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद आहे. ही योजना रत्नागिरी जिल्ह्यातही राबवली जात आहे. यामधून सार्वजनिकसह वैयक्तिक कामेही घेणे शक्य आहे. विकास कामांबरोबरच गावातल्या गावात लोकांना रोजगाराचे साधन यामधून उपलब्ध होते. तसेच आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होत आहेत. मे महिन्यामध्ये मनरेगातर्फे दहा गावे निवडण्यात आली होती. प्रत्येक तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. त्या गावातील प्रत्येक घरात जाऊन मनरेगामधून कोणती कामे घेता येऊ शकतात याचा आराखडा बनविला आहे. 210 कोटी 33 लाखांची कामे करता येणार आहेत.
यामध्ये वैयक्तिक 9 हजार 721 तर सार्वजनिक सुमारे 700 कामांचा समावेश आहे. यामध्ये कुशल आणि अकुशल कामांसाठी निधी दिला जातो. याची अंमलबजावणी पुढील दहा वर्षे केली जाणार असून दरवर्षी या कुटूंबांकडून कामाचे प्रस्ताव घेतले जाणार आहे. यामधून प्रतिदिन 256 रुपये रोज दिला जातो. दहा गावांमध्ये सर्वाधिक 1 हजार 796 कामे शोषखड्डे, नाडेपची 1 हजार 217 तर फळबाग लागवडीची 1 हजार 8 कामे आहेत. मनरेगातून सिंचन विहीर, शोषखड्डे, नाडेप, घरकुल, शेततळे, शौचालये, फळबाग लागवड, गांडुळ खत, गुरांचा गोठा, शेळी पालन शेड, कुक्कुट पालन शेड, ढाळीचे बांध, विहीर पुनर्भरण, आझोला, महोगनी, शेत सपाटीकरण, वैयक्तिक रोपवाटिका, बांध बंदिस्ती, दगडी बांध, माती बांध, पडिक जमीन वृक्ष लागवड, रस्ते, बांबू लागवड, किचनशेड, स्मशानभूमी दुरुस्ती, अस्तीकरण शेततळे, सीसीटी, मत्स्यशेती यासह सार्वजनिक कामांचाही समावेश आहे.