जो विकासाचा विचार करेल, तोच आमचा पुढचा खासदार : जठार; राजापुरात भाजपाचा रिफायनरी स्वागत मेळावा

मोदी सरकारच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राजापुरात आता रिफायनरी प्रकल्प होणार हे अटळ आहे. या माध्यमातून येणार्‍या विकासगंगेच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी सज्ज झाले पाहिजे. जो रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासाचा विचार करेल, तोच आमचा पुढचा खासदार असेल, असा निर्धार आपण यानिमित्ताने केला पाहिजे, असे प्रतिपादन देवगडचे माजी आमदार व भाजपाचे नेते प्रमोद जठार यांनी येथे केले.
राजापूर तालुका भाजपाच्यावतीने शहरातील श्री मंगल कार्यालयात भाजपा प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित रिफायनरी स्वागत मेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना जठार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, अ‍ॅड. विलास पाटणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, भाजपा नेत्या  उल्का विश्वासराव, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, महिला तालुकाध्यक्षा श्रुती ताम्हनकर, लांजा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, यशवंत वाकडे, प्रा. मारूती कांबळे, अभिजित कांबळे, संतोष गांगण, अनिल करंगुटकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जठार म्हणाले की, या रिफायनरीच्या माध्यमातून घराघरात रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र विकासाच्या पैशावर डल्ला मारायला काही मंडळी टपलेली आहेत.  लवकरच आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेणार आहोत.  येथील तरूणांना रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सोयी सुविधा व्हाव्यात, यासाठी आपण आग्रही राहणार आहोत. आमची मुले येथे नोकरीला लागली पाहिजेत.
जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन बोलताना म्हणाले की, आता रिफायनरी पुन्हा येणार म्हणून काहीजण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिफायनरीला आता हिरवा कंदील मिळालेला आहे. त्यामुळे विकासाची कास धरणारी, उपजीविकेचे साधन बनणारी रिफायनरी कशी आहे, याची सत्य बाजू समजून घेतली पाहिजे. यातून राजापूरच्याच नाही तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गती मिळेल. यावेळी अ‍ॅड. पाटणे म्हणाले की, इतिहास काळात राजापूर हे दोन्ही जिल्ह्यांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.  राजापूर हे जिल्ह्याचे प्रमुख केंद्र बनेल एवढी क्षमता या रिफायनरीमध्ये आहे. 3 लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून रोजगार निर्माण होईल.
या कार्यक्रमात आभार भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी मानले. तर सूत्रसंचालन अ‍ॅड. सुशांत पवार यांनी केले. रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशा घोषणांनी यावेळी सभागृह दणाणून गेले होेते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button