आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची तयारी; कुमार शेट्ये यांनी घेतली अजितदादांची भेट
रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समिती, रत्नागिरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर जिल्हा व तालुकास्तरावर शासकीय व अशासकीय कमिट्यांवरील पदे भरण्याबाबतही विचारविनिमय यावेळी झाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल कधीही वाजेल अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची पूर्वतयारी व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये आणि त्यांचे सहकारी पक्षसंघटन मजबुत व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. निवडणुकीवेळी महाआघाडी होणार असेल तर कोणती भूमिका घ्यावी? पक्षसंघटनेत कोणत्या हालचाली सुरू आहेत. त्याचे काय परिणाम होत आहेत, याबाबतची माहिती कुमार शेट्ये यांनी उपमुख्यमंत्री आणि खा. सुप्रिया सुळे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे