देवरूख सोसायटीच्या अध्यक्षपदी संतोष लाड तर उपाध्यक्षपदी सुनील सावंत यांची निवड
संगमेश्वर : तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या देवरूख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे संतोष लाड यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील सावंत यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. देवरूख सोसायटीची निवडणूक भाजपा- मनसेचे श्री देवी सोळजाई परिवर्तन पॅनल, महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनल, शेतकरी विकास आघाडी अशी तिरंगी झाली. १३ जागांसाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनलने बाजी मारत एकहाती विजय मिळवला. महाविकास आघाडीत शिवसेना-राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तर काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देण्यात आला होता. या निवडणुकीत शिवसेनेचे सात तर राष्ट्रवादीचे सहा उमेदवार निवडून आले. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बुधवारी निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे संतोष लाड तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सुनील सावंत यांचे अर्ज दाखल झाले. छाननीमध्ये हे अर्ज वैध ठरले. यामुळे लाड यांची अध्यक्षपदी तर सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे दुय्यम निबंधक अधिकारी संतोषकुमार पाटील यांनी जाहीर केले. सदस्यपदी सुबोध पेडणेकर, रवींद्र जागुष्टे, हनिफ हरचिरकर, प्रफुल्ल भुवड, राजेंद्र गुरव, संजय नाखरेकर, प्रियंका जागुष्टे, सुजाता कांगणे, दत्तात्रय ढवळे, तुषार थरवळ, राजेंद्र पंदेरे यांची निवड झाली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांना शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.