
शहराला एक दिवस आड पाणी तर.. लाखो लिटर पाणी वाया,भाजप शहर चिटणीस निलेश आखाडे यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष.
रत्नागिरी : शहरामध्ये पाण्याच्या नियोजनासाठी एक दिवसआड शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे; मात्र रत्नागिरी शहर साळवी स्टॉप येथे असणाऱ्या नगर परिषदेच्या पाण्याच्या टाक्या वाहत असून अनेक ठिकाणी लिकेज आहेत तसेच पाण्याची लोखंडी पाईप लाईन ही देखील अनेक ठिकाणी वाहत आहे. या सर्वातून सुमारे लाखो लिटर पाणी योग्य नियोजन नसल्याने वाहून जात आहे. याकडे भारतीय जनता पार्टीचे शहर चिटणीस निलेश आखाडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नळपाणी योजना जोडणी करत असताना गेले वर्षभरात असे अनेकदा हजारो लिटर पाणी शहरातील विविध ठिकाणी वाया गेले आहे असे देखील शहरातील अनेक नागरिकांनी मत व्यक्त करताना सांगितले असल्याचे आखाडे यांनी सांगितले.
एकीकडे एक दिवस आड पाण्याचा पुरवठा करून दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जाणे योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रत्नागिरी नगरपरिषदेने या कडे गांभीर्याने पाहून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी व रत्नागिरी नगरपरिषद यांच्याकडे करण्यात आली आहे.