मंदिरात झोपलेल्या पोतराजच्या पत्नीवर मध्यरात्री अज्ञाताचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; प्रतिकार करणाऱ्या पतीला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
खेड : जोगवा मागत दिवसभर फिरून दमलेले पोतराज दाम्पत्य रात्रीच्यावेळी मंदिराच्या आडोशाला स्थिरावले… ऐन मध्यरात्री झोपलेल्या पत्नीची अज्ञाताने छेड काढली… पतीसमोर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला… पतीने स्वतःसह पत्नीला वाचवण्यासाठी प्रतिकार केला. मात्र त्या नराधमाने पतीच्या डोक्यात जड लाकडाने जोरदार फटका मारला. यात जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वासनेची पातळी ओलांडलेल्या या घटनेत खेड पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून या नराधमाचा शोध पोलिस घेत आहेत.
एक पोतराज दाम्पत्य खेडमधील भरणे नाका या ठिकाणी काळकाई मंदिरासमोरील प्रांगणामध्ये झोपले होते. शनिवार २१ मे रोजी मध्यरात्री २ :३० वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने त्या ठिकाणी येऊन या महिलेची छेड काढली. यावेळी त्या महिलेच्या नवऱ्याला जाग आली आणि त्या व्यक्तीला त्याने तिथून हटकले. त्यानंतर थोड्या वेळाने तो इसम पुन्हा त्या ठिकाणी आला. त्या महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर त्या महिलेच्या नवऱ्याने त्याला प्रतिकार करत हटकले. याचा राग येऊन त्या अज्ञात इसमाने त्या महिलेच्या पतीच्या डोक्यात लाकडाने जोरदार घाव घातला. यामध्ये त्या महिलेचा पती गंभीर जखमी झाला आणि जागेवर बेशुद्ध पडला. परिसरात झालेल्या आरडाओरडामुळे हल्ला करणारा अज्ञात तिथून पळून गेला. जखमी पोतराजला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सोमवारी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जखमी पोतराज सुरेश कोळे याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पार्थिव कर्नाटक येथील त्यांच्या गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आले. अज्ञात हल्लेखोराला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक खेडला दाखल झाले आहे.