चौपदरीकरणाच्या सर्व्हिस रोडकडे दुर्लक्ष, धुरळा व वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

0
56

खेड : कशेडी ते परशुराम घाट या भागात चौपदरीकरण काम करणार्‍या ठेकेदाराने मात्र या भागात सर्व्हिस रोडचे काम अक्षरशः कोमात घालवले आहे. परिणामी वर्दळीच्या ठिकाणी वाहनचालकांना धुरळा व वाहतूक कोंडीच्या समस्येला सतत तोंड द्यावे लागत आहे.
खेड तालुक्यातील कशेडी ते परशुराम घाट या भागात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीने काम पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र भरणे, दाभिळ नाका, लोटे, वेरळ आदी ठिकाणी महामार्गावरून तालुक्यातील अन्य भागात येण्या-जाण्यासाठी असलेल्या सेवा मार्गाची रुंदी योग्य नसल्याने वाहतूक कोंडी सतत जाणवत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू असताना या मार्गावरील वाहतूक विना अडथळा सुरू राहील, अशी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीवर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून सोपविण्यात आली आहे. परंतु महामार्गाचे ठेकेदार आपल्या जबाबदारीपासून दूर पळत असल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग  किनारपट्टीवरून जातो. येथील भौगोलिक परिस्थितीमुळे दाट लोकवस्ती या मार्गालगत आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू करण्यापूर्वी चारपदरी महामार्गामुळे दुभाजल्या जाणार्‍या भागामध्ये सर्व्हिस रोड तयार करून मग काम सुरू करण्यात येईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांची होती. परंतु चौपदरीकरण कामाचा ठेका घेतलेल्यांनी मात्र केवळ चार पदरी रस्ता तयार करण्याकडेच लक्ष केंद्रित केलेले दिसत आहे. परिणामी चारपदरी रस्त्याच्या लगतच्या लोकवस्त्यांमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबणे, उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांना चारपदरी रस्त्यावर येताना व ग्रामीण भागात जाणार्‍या जोड रस्त्याकडे जाताना  महामार्गालगत सर्व्हिस रोड नसल्याने  तारेवरची कसरत करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here