रत्नसिंधू योजनेतून एक तरी उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा : खासदार विनायक राऊत, रत्न कृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन
रत्नागिरी : रत्नसिंधू योजनेसाठी दीडशे कोटींची तरतूद केली आहे. अजून साडेतीनशे कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचा फायदा घेऊन प्रत्येक वाडीत या योजनेतील एक तरी उपक्रम अमलात आणण्यासाठी रत्नागिरीवासीयांनी पुढाकार घ्यावा, असे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. रत्न कृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी खा. राऊत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुर्हाडे, रोहन बने, राजेंद्र महाडिक, वेदा फडके, डॉ. धनंजय जगदाळे, श्री. मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, जिल्हा परिषद पशुविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ठिकाणी 120 स्टॉल लावण्यात आले असून कोकणी खाद्यपदार्थ यांचे स्टॉल आहेत.
यावेळी खासदार राऊत म्हणाले, अत्यंत थोड्या कालावधीत कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ शेतकर्यांनी घेतला पाहिजे. पंजाबहून आणलेला सव्वा लाखाचा बकरा, चाळीस किलो वजनाचे कलिंगड हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. सध्या माती परीक्षण ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कर्मचारी रत्नागिरीतील प्रयोगशाळेत उपलब्ध करून दिले जातील, असे खा. राऊत यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकर्याला राज्य, देश नव्हे तर जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन सुधारित जातींच्या लागवडीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्याचे फळबाग लागवडीखाली क्षेत्र एक लाख 92 हजार हेक्टर असून त्यात वाढ करण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा लाभ दिला जात आहे. मधुमक्षी पालनाला 50 लाख तरतूद केली आहे. शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी झिरो बजेट शेतीचे नियोजन केले पाहिजे. तसेच शेतकर्यांनी अझोलाचा वापर खत म्हणून केला तर उत्पादनात वाढ होऊ शकते.