मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे वाहतूक कोंडी
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा पेट्रोल पंप या ठिकाणी सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. विशेषत: सायंकाळच्यावेळी ही ट्रॅफिक जामची मोठी समस्या निर्माण होत आहे. महामार्गालगत काही विक्रेत्यांनी ठाण मांडले असून त्यांच्यामुळेच ही समस्या उद्भवत असल्याचे महामार्गावरील प्रवाशांतून सांगितले जात आहे.
सद्यस्थितीत महामार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. हातखंबा तिठा पेट्रोल पंप या ठिकाणी महामार्गालगत विक्रेत्यांनी ठाण मांडले असून महामार्गालगत आपले स्टॉल मांडत असल्याने आणि ते खरेदीसाठी येणारे पर्यटक, नागरिक महामार्गावरच आपली वाहने उभी करत असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत आहे. अर्धा पाऊण तास वाहने अडकून राहात आहेत. प्रवाशांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.