राजापुरातील मुख्य रस्ता केला बंद; भाजप आक्रमक झाल्यानंतर एकेरी वाहतूक केली सुरू
राजापूर : शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करत रस्ता बंद केल्याप्रकरणी राजापूर तालुका भाजपाच्यावतीने गुरुवारी आक्रमक पवित्रा घेण्यात आला. भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी मुख्याधिकारी सुशांत भोसले यांच्याशी चर्चा करत या ठिकाणी दुचाकी, रिक्षा यांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याची मागणी केली. तत्काळ या ठिकाणी रिक्षा व दुचाकीसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्याबाबत नियोजन केले. राजापुरातील जकात नाका ते जवाहरचौक या मुख्य रस्ताच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या लगत असलेल्या पाणीपुरवठा वाहिनीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले असून, त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली. मात्र, हे काम करत असताना राजापूर नगरपरिषद व संबधीत ठेकेदाराने वाहतुकीबाबत योग्य नियोजन न केल्याने जनतेची आणि राजापूर ग्रामीण रुग्णालयात येणार्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत न. प. प्रशासनाला जाब विचारला. किमान एकेरी वाहतूक सुरू करून रिक्षा व दुचाकी यांना ये-जा करण्यास जागा करावी, अशी मागणी केली. तशा सूचना मुख्याधिकारी भोसले यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या व तत्काळ तशी वाहतूक सुरू करण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे अरविंद लांजेकर, अमित नार्वेकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.