रत्नागिरी बसस्थानकाचे काम रखडलेलेच!ठेकेदाराने बजेट 50 टक्क्यांनी वाढवून मागितले, प्रवाशांना होतोय त्रास
रत्नागिरी : रत्नागिरी बसस्थानकाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. यामुळे प्रवाशांना बाहेर उन्हात उभे राहावे लागत आहे. हे काम कधी पूर्ण होणार? असा संतप्त सवाल व्यक्त होत आहे.
कोरोना काळापासून रत्नागिरी मुख्य बसस्थानकाचे काम पूर्णत: बंद आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदार आणि परिवहन महामंडळ यांच्यात कामाचे बजेट आणि जीएसटीविषयी चर्चा सुरू आहे. बजेट वाढवून देत नसल्याने ठेकेदार काम सुरू करत नसल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सुत्रांनी दिली.
रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे सहा वर्षांपूर्वी जे टेंडर काढण्यात आले होते ते 17 कोटींचे होते. त्यानंतर सरकार बदलले आणि पुन्हा नवीन टेंडर काढण्यात आले. आताचे हे बजेट 10 कोटींचे आहे. या बजेटमध्ये काम करणे अशक्य असून बजेट वाढवून देण्याची मागणी ठेकेदाराकडून करण्यात आली आहे. ठेकेदारांनी 10 कोटी बजेटमध्ये काम पूर्ण होणार नाही त्यामुळे हे बजेट 50 टक्क्यांनी वाढवून द्यावे असे पत्र एसटी महामंडळाला दिले आहे. आता यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या अडीच वर्षापासून एसटी बसस्थानकाचे काम पूर्णत: थांबले आहे. ठेेकेदाराला कालमर्यादा पुन्हा वाढवून देण्यात आली होती. मात्र दहा वर्षांपासून अजूनही हायटेक बसस्थानकाचे काम रखडले आहे.
सध्या सर्व कारभार रहाटाघर येथून चालत आहे. मुख्य बसस्थानकाच्या ठिकाणी उन्हात बसची वाट पाहावी लागत आहे. रत्नागिरी मुख्य बसस्थानकाच्या बाहेर एका झाडाचा आधार घेऊन प्रवासी उभे असतात. येथील शहर बससेवेच्या इमारतीचे छप्परही फुटले आहे. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी पाण्याचा वर्षाव होणार आहे.