क्रांतीसूर्य सावरकर आणि रत्नागिरीतील पतितपावन मंदिर

0
158

२८ मे २०२२. स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३९ वी जयंती. यानिमित्ताने त्यांच्या प्रेरक व तेजस्वी स्मृतीला रत्नागिरीकरांतर्फे विनम्र अभिवादन!

अंदमानच्या कारागृहात दुहेरी जन्मठेप भोगत असताना त्या कारागृहातून सुटका झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १६ मे १९२१ रोजी रत्नागिरीच्या भूमीवर पाऊल ठेवले… पण तेही बंदी म्हणून.१०१ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने त्यांना रत्नागिरी येथील विशेष कारागृहात आणून एकांतवासातील कोठडीत बंदी म्हणून ठेवले. या बंदिवासात सावरकरांनी अनेक विषयावर महत्त्वाचे लेखन व तसेच सामाजिक स्वरुपाचे कार्य केले, परंतु तो एक वेगळ्या लेखाचा विषय ठरेल.

रत्नागिरीच्या विशेष कारागृहात अडीच वर्ष बंदिवास भोगलेनंतर सावरकरांना पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले; परंतु नंतर त्यांच्या मुक्तीसाठी भारतीयांनी केलेल्या सततच्या मागण्यांमुळे व त्यामुळे आलेल्या दबावामुळे इंग्रज सरकारने त्यांची जानेवारी १९२४ च्या सुरुवातीला कठोर अटींवर मुक्तता केली.

सावरकरांच्या सुटकेचा आदेश करताना “ब्रिटिश सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय रत्नागिरी जिल्हा सोडावयाचा नाही, कोणत्याही राजकीय स्वरूपाच्या कामात भाग घ्यायचा नाही, सरकारविरूद्ध टीका करायची नाही, “असे सरकारने निर्बंध घातले होते. या निर्बंधांचा भंग झाल्यास उर्वरित शिक्षा सावरकरांना भोगावी लागेल, असेही या आदेशात नमूद केले होते. दुसरी कोणीही व्यक्ती असती तर ती अशा निर्बंधानी खचून गेली असती, परंतु सावरकर म्हणजे बावनकशी राष्ट्रभक्त असलेल सोनं होतं.

त्याहूनही महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे मातृभूमीसाठी पूर्णतया समर्पित असणारी सावरकरांची निग्रही मानसिकता.

अष्टभुजादेवीसमोर शपथ घेताना ‘ मारिता मारिता मरेतो झुंजेन ‘ अशी शपथ घेणारे बाल सावरकर आणि लंडनमध्ये ‘ माझे मृत्यूपत्र ‘ ही कविता लिहिताना आपल्या बुद्धी व लेखणी बरोबरच ‘हे मातृभूमी तुजला मन वाहियेले’ असं म्हणत आपले सगळ्यात चंचल असणारे मनसुद्धा देशासाठी समर्पित केल्याची युवा सावरकरांनी व्यक्त केलेली भावना विचारात घेता कोणत्याही परिस्थितीत आपलं सर्वस्व देशासाठी देण्याची सावरकरांची सुरुवातीपासून असलेली मानसिकता स्पष्ट होते.

या पार्श्वभूमीवर सावरकरांची राजबंदी म्हणून मुक्तता करताना ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर घातलेल्या निर्बंधांचे स्वागत सावरकरांनी कशा प्रकारे केले हे समजून घेणं खूपच महत्त्वाचं ठरतं.

सावरकरांची मुक्तता करताना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ज्यावेळी या निर्बंधांची माहिती दिली त्यावेळी व त्यानंतरही वेळोवेळी सावरकरांनी या निर्बंधांचे स्वागत “जोपर्यंत माझी बुद्धी, वाणी व लेखणी शाबुत आहे, तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाचे निर्बंध मला माझ्या ध्येयपूर्तीपासून रोखू शकत नाहीत ” अशा प्रेरक शब्दांत केले होते. रत्नागिरीमध्ये असताना या क्रांती सूर्याने केलेले कार्य समजून घ्यायचे असेल तर त्यांची ही मानसिकता लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

बालपणापासून सावरकरांनी केलेल्या विस्तृत वाचनातून तसेच अंदमान कारागृहात सहकारी कैद्यांच्या वर्तणुकीच्या केलेल्या सखोल अवलोकनातून सावरकरांनी हिंदू समाजाच्या मानसिकतेचा पूर्णपणे अभ्यास केला होता.रत्नागिरी कारागृहात हिंदुत्व ग्रंथाचे लेखन करतानासुद्धा सावरकरांनी आपल्या हिंदू समाजातील दोष कायमचे काढून टाकण्यासाठी करावयाच्या कामाचा कच्चा आराखडा तयारही केला होता.

अशा परिस्थितीत सुटकेच्यावेळी ब्रिटिश सरकारने घातलेल्या अटींची सांगड सावरकरांनी आपल्या बुद्धीकौशल्याने हिंदू समाजातील अनिष्ट रुढी व जातीभेद निर्मूलन करुन सुदृढ हिंदू समाजनिर्मिती आणि संघटन करण्याच्या विषयाशी घातली.

यामुळे एका बाजूला इंग्रज सरकारने घातलेल्या निर्बंधाचे पालन तर होणार होतेच; पण त्याचबरोबर नजिकच्या भविष्यकाळात मातृभूमी स्वतंत्र झाल्यानंतर आपला देश समर्थपणे चालविण्यासाठी आवश्यक असणारा निरोगी आणि संघटित हिंदू समाज निर्माण करणेही त्यामुळे शक्य होणार होते.

या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून स्वातंत्र्यवीरानी आपल्या रत्नागिरीतील राजकीय बंदिवासाच्या काळात हिंदू समाजातील दोषांचे निर्मूलन करून
‘समरस हिंदू’ समाज निर्मितीचा संकल्प निश्चित केला.

इतकेच नव्हे तर नंतरच्या साडेतेरा वर्षांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी   आपल्या  कठोर कार्यकर्तृत्वाने आपल्या संकल्पाला   समाज क्रांतीत परावर्तित केले.

आठ जानेवारी१९२४ रोजी रत्नागिरीत प्रवेश केल्यापासूनच सावरकरानी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. २४ जानेवारीच्या सुमारास त्यानी रत्नागिरीमध्ये ‘ हिंदू सभा ‘ या नावाने एका अशासकीय संघटनेची स्थापना केली. त्यानंतरच्या साडे तेरा वर्षामध्ये याच हिंदू सभेच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांचे सहकारी म्हणून त्यांच्या संपूर्ण मोहिमेमध्ये आणि संकल्प सिद्धीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले .

सप्टेंबर १९२४ च्या सुमारास रत्नागिरीत प्लेग पसरू लागला होता. त्यामुळे
रत्नागिरी शहरा शेजारच्या शिरगाव येथील रहिवासी श्रीयुत विष्णुपंत दामले यांच्या घरात सावरकरांनी काही महिने मुक्काम केला. अर्थात याहीवेळी त्यांनी आपलं प्रस्तावित कार्य करण सोडल नव्हत.विष्णुपंत दामले व शिरगावातील अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी शिरगावातच आपल्या हिंदू समाज संघटन कार्याचा एक छोटा पथदर्शी प्रकल्प राबवला. तेथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व हिंदू ग्रामस्थांना एकत्रित करून सामूहिक हिंदू एकता गीतगायन करणे, गावातील हिंदू समाजाच्या सर्व लोकांना एकत्र घेऊन गावातील घरांमधून भेटी देणे, वाड्यावरील भजन कीर्तनात सहभाग घेणे,महिलांचे सार्वजनिक हळदी कुंकू समारंभ आयोजित करणे असे हिंदू समाजातील व्यक्तींचे विविध कारणांनी एकत्रीकरण घडवणारे अनेक छोटे छोटे उपक्रम सावरकरांनी शिरगावात राबवले व आपल्या प्रस्तावित समाजक्रांतीचा श्रीगणेशा केला.

शिरगावात दामले यांच्या घरात असताना डॉ केशव बळीराम हेडगेवारजी यांनी नागपूर येथून येऊन तात्याराव सावरकरांची दामले यांच्या घरात भेट घेतली व हिंदू संघटन विषयावर महत्त्वपूर्ण विचारमंथन केले आणि सावरकरांचे मार्गदर्शन घेतले . यातूनच १९२५ च्या विजयादशमीला नागपूर येथे डॉ हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

शिरगाव येथील प्लेगची साथ संपल्यानंतर तात्याराव सावरकर पुन्हा रत्नागिरीत आले व त्यांनी आपले हिंदू संघटनाचे काम पुढे सुरू केले.

सावरकरानी केलेल्या अभ्यासाप्रमाणे हिंदू समाजातील सर्व व्यक्तींची मंदिर व त्यातील दैवताकडे असणारी आसक्ती व भक्ती पाहता हिंदू संघटनासाठी मंदिर हेच एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरू शकेल याची त्यांनी निश्चिती केली . आणि म्हणूनच सावरकरांनी आपल्या ‘ समरस हिंदू ‘ प्रकल्पासाठी मंदिर हेच माध्यम निवडलं आणि मंदिराच्या माध्यमातून सर्व हिंदूंना एकत्र करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला सावरकरांनी रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरामध्ये सर्व हिंदूंना गाभाऱ्यापर्यंत प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले.या प्रयत्नात काही प्रमाणात त्यांना यश आले आणि विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात सर्व समाजाला घेऊन जाण्यात सावरकर यशस्वी ठरले, परंतु त्यावेळी सावरकरांना हिंदू समाजाच्याच एका घटकाकडुन झालेला विरोध पाहता आपल्या उद्दिष्टांसाठी एक स्वतंत्र मंदिरच निर्माण करणं हा त्यावर योग्य उपाय आहे असे सावरकरांचे निदर्शनास आले.

याच सुमारास रत्नागिरीतील भंडारी समाजाचे दानशूर व्यक्तिमत्त्व श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी किल्ला भागात स्वत:चे पूजेसाठी बांधलेल्या भागेश्वर मंदिरातील शिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सावरकरांना आमंत्रित केले व त्यावेळी त्या दोघांची भेट झाली. कीर शेठना इतर मंदिरांत जाऊन स्वतः पूजा करण्यास परवानगी मिळत नव्हती, म्हणून त्यानी किल्ला भागात स्वतः भागेश्वराचे मंदिर बांधले व तिथे ते स्वतः पूजा करुन उत्सव साजरे करीत असलेबाबत सावरकराना माहिती दिली.

त्या वेळी सावरकर भागोजी कीरशेठ याना म्हणाले की आपण श्रीमंत असल्यामुळे स्वतः मंदिर बांधून ईश्वराची पूजा करु शकत आहात. परंतु हिंदू समाजात असे अनेक लोक आहेत की जे सामाजिक बंधनांमुळे व गरिबीमुळे स्वतः मंदिर उभारू शकत नाहीत अथवा मंदिरात जाऊन ईश्वरपूजा करू शकत नाहीत. तरी त्यांच्यासाठी आपण काही करावे अशी सावरकरांनी भागोजीशेठ कीर यांना विनंती केली.

कीर शेठजींनी सावरकरांची ही विनंती ताबडतोब मान्य केली व रत्नागिरीमध्ये सर्व हिंदूंना मंदिरात जाऊन पूजा करण्याची मुभा असणारे मंदिर स्वतः उभारून देण्याचे आश्वासन दिले आणि यातूनच पतितपावन मंदिराच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

यानंतर रत्नागिरी शहरामध्ये शेवडे यांची जागा विकत घेण्यात आली व त्या ठिकाणी कीर शेटजीनी आपल्या पैशांनी एका आकर्षक आणि नक्षीदार अशा मंदिराची निर्मिती केली तेच हे पतितपावन मंदिर.

फाल्गुन शुद्ध पंचमीला या मंदिराचा कलशारोहण सोहळा श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या हस्ते थाटात व कमालीच्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी हिंदू धर्माच्या सर्व समाजातील नेते व कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते. या विविध समाजाच्या सर्व नेत्यांनी सावरकरांच्या हिंदू समाज संघटन कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला. इतकेच नव्हे तर ज्यासाठी आम्ही आयुष्यभर राबलो ते आमचे स्वप्न सावरकरांनी साकार केले. त्यामुळे आमचे उर्वरित आयुष्य सावरकराना लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना सुद्धा केली.

पतित पावन मंदिरामुळे हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन व परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार मिळाला. असा अधिकार दिलेले हे भारतातले पहिले मंदिर आहे आणि म्हणूनच हे मंदिर
” सामाजिक समरसतेचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र” म्हणूनही प्रसिध्द आहे.

या मंदिराच्या उभारणीस सुरुवात झाल्यापासूनच सावरकरांनी हिंदू समाजातील अनिष्ट रूढीं विरुद्ध एल्गार केला. त्यामध्ये जातिभेद निर्मूलन अभियान आणि हिंदू समाजातील सात अनिष्ट रूढी विरूध्द सावरकरानी दिलेला लढा पूर्णपणे परिणामकारक ठरला.यासाठी सावरकरांनी लेख व व्याख्याने, सहभोजने, सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ, मेळे अणि अखिल हिंदू गणेशोत्सव आयोजन, विविध वाड्यावर जाऊन केलेली भजने व कीर्तने तसेच सर्व हिंदू समाजास एकत्र घेऊन शहरामध्ये सर्व लोकांच्या घरी जाऊन दसऱ्याला सोने वाटणे व इतर उपक्रम यामुळे हिंदू संघटनाच्या कार्यात कमालीची गति मानता आली. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमांची दखल केवळ देशानेच नव्हे तर थेट लंडन येथील वृत्तपत्रे व पार्लमेंट हाऊसने देखील घेतली.

या मंदिराच्या निर्मितीमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी वास्तव्यातील एका महत्त्वाच्या संकल्पाची सिद्धी झाली आहे असे म्हणावे लागेल.

आयुष्याच्या तारुण्यात सशस्त्र क्रांती घडविणाऱ्या सावरकरांनी रत्नागिरी येथील वास्तव्यात आपल्या कार्यकर्तृत्वाने अस्पृश्यता निर्मूलनाची आणि सामाजिक समरसतेची आणखी एक क्रांती घडवून इतिहासाचे पानावर परत एकदा आपले नाव कोरले आहे.

– लेखक: प्रदीप तथा बाबा परुळेकर

  • पतितपावन मंदिर, रत्नागिरी*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here