दापोलीत शिवसंपर्क अभियानाची जबाबदारी आमदार योगेश कदमांवर; दळवींच्या गटाला डावलले
दापोली मतदार संघात शिव संपर्क अभियान राबविण्याची जबाबदारी आमदार योगेश कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याची घोषणा शरद बोरकर यांनी केल्यानंतर आमदार कदम समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. अनेकांनी सभागृहातच घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्ह्यात 26 मे 29 मे दरम्यान शिवसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख शरद बोरकर आणि जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मोरे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी बहादूर शेख नाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक झाली.
दापोलीत माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि आमदार योगेश कदम यांचे दोन गट आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीची सूत्रे दळवी यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे शिवसंपर्क अभियान नक्की कोण राबवणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र नेतृत्वाकडून योगेश कदम यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती बोरकर यांनी बैठकीत दिली. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या दळवी समर्थकांचे चेहरे फिके पडले.