स्तोत्र, काव्यगायनातून आद्य शंकराचार्यांचा उलगडला जीवनक्रम

रत्नागिरी : आद्य शंकराचार्य विरचित शिवपंचाक्षर स्तोत्र, नर्मदाष्टक, जागन्नाथाष्टक, भवान्याष्टक, कृष्णाष्टक आणि देव्यपराधक्षमापन स्तोत्र सादर करत आद्य शंकराचार्यांच्या जीवनक्रम उलगडणारा सुरेल कार्यक्रम चिपळुणच्या कात्यायनी स्तोत्र पठण मंडळाने सादर केला. निमित्त होते आद्य शंकराचार्यांच्या जयंतीचे. येथील श्री. गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने राणी लक्ष्मीबाई सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कात्यायनी स्तोत्र पठण मंडळाच्या सौ. शीला केतकर आणि सहकाऱ्यांनी विविध स्तोत्रांतून शंकराचार्यांचे जीवनचरित्र उलगडले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, पाठशाळेच्या उपाध्यक्ष प्रतिभा प्रभुदेसाई, सचिव जयराम आठल्ये, सौ. केतकर यांनी सरस्वतीदेवी, आद्य शंकराचार्य आणि राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर सर्व कलाकारांचा श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. स्वरूप नेने (तबला), श्रीरंग जोगळेकर (हार्मोनियम) यांनी संगीतसाथ केली.

शंकराचार्यांचा जन्म वडील शिवगुरू व आई विशीष्टादेवी (आर्यांबा) हिच्या पोटी झाला. आद्य शंकराचार्य हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. भारतभ्रमण करून त्यांनी वैदिक धर्माची पुनःस्थापना केली. त्यांनी द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यावर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली. शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर (ब्रह्मसूत्र, उपनिषदे व भगवद्गीता) आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले. तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली. या रचना, स्तोत्रांवर सुरेल कार्यक्रम सादर करताना कात्यायनी भगिनी मंडळाने शंकराचार्यांचा जीवनक्रम उलगडला.

आद्य शंकराचार्यांनी केरळपासून काश्मिरपर्यंत हिंदु धर्म उत्थानाचे कार्य केले. त्यांच्या रचना केवळ परमेश्वर स्तुती नव्हे त्यांचा सुधारणावादी दृष्टिकोन दाखवतात. यातून त्यांचे व्यक्तीमत्व प्रकट होते, असे कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगून शंकराचार्य विरचित षट्पदी सादर केली.

डॉ. कल्पना आठल्ये म्हणाल्या की, पाठशाळेला १०६ वर्षांची परंपरा आहे. वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री गाडगीळ-पुराणिक हे पहिले अध्यापक येथे होते. त्यानंतर व्याकरण वाचस्पती दिगंबरशास्त्री जोशी, व्याकरणाचार्य पुरुषोत्तमशास्त्री फडके, व्याकरणरत्न बाळकृष्ण हर्डीकर, काव्यतीर्थ दा. गो. जोशी, काव्यतीर्थ विनायक पोखरणकर अशा आचार्यांची दीर्घ परंपरा पाठशाळेला लाभली आहे. अध्ययन- अध्यापन परंपरा पुन्हा सुरू करण्याची दृढ इच्छा आहे. पाठशाळेने अनेक विद्यार्थी घडवले असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. पाठशाळेचे सचिव जयराम आठल्ये यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button