काजरघाटीतील महालक्ष्मी मंदिरात रंगणार बहुरंगी नमन
रत्नागिरी ः शहराजवळील पोमेंडी खुर्द (काजरघाटी) येथील महालक्ष्मी मंदिरात महाराष्ट्र दिनी (ता. १ मे) वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार असून रात्री देवरूख-कुंभारवाडीतील बहुरंगी नमन विशेष आकर्षण ठरणार आहे.
महालक्ष्मी मंदिराचा शिमगोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी सकाळी आठ वाजता अभिषेक, सप्तशती पाठाचे हवन, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती, दुपारी २ ते ३ आणि सायंकाळी साडेसात ते रात्री १० पर्यंत महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता धुपारती, रात्री १० वाजता देवरूख-खालची कुंभारवाडी येथील संत गोरोबाकाका प्रासादिक नमन मंडळाचे बहुरंगी नमन होणार आहे.
दरम्यान, महालक्ष्मी देवस्थान परिसर सुशोभीकरण व नुतनीकरण योजनेंतर्गत मंदिराशेजारी असलेल्या पुरातन भराडी देवी स्थानाचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविण्यात आले आहे. नुकताच या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कामासाठी सुमारे चार लाखाचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठीही दानशूर भाविकांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन महालक्ष्मी देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे. तसेच महाराष्ट्र दिनी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद व बहुरंगी नमन आदी कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेऊन देवस्थानचे विविध उपक्रमामध्ये सहभाग द्यावा, असे आवाहन महालक्ष्मी देवस्थान आणि ग्रामस्थांनी केले आहे.