नांदिवडेची आत्महत्या नव्हे तर तो खूनच! प्रेमात नकार दिल्याचा राग ठेवत प्रियकराने प्रेयसीला लावला गळफास
रत्नागिरी : कोणत्यातरी कारणातून प्रेमसंबंध तुटले… एकमेकांना भेटणेही बंद झाले… तो तिच्या मागावर होता पण ती त्याला दाद देत नव्हती. अखेर सायंकाळच्या वेळेला भेट होताच त्याने तिला प्रेमाची विनवणी केली. मात्र तिने त्याला दाद न दिल्याने त्याने तिचा गळा दाबला. त्यानंतर आंब्याच्या झाडावर ओढणीने गळफास लावून ठार मारले. रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे गावात घडलेल्या या घटनेचा जयगड पोलिसांनी अल्पावधीतच छडा लावला आहे. आरोपीने या घटनेची कबुली पोलिसांना दिली आहे.
तालुक्यातील नांदिवडे येथील तरुणीची आत्महत्या झाल्याची घटना घडली होती. मात्र ही आत्महत्या नसून खून असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. समीर प्रकाश पवार (वय 22, मूळ राहणार आगरनरळ शिंदेवाडी, सध्या राहणार नांदिवडे अंबुवाडी, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
प्रेमप्रकरणात झालेल्या वादातून संशयित समीर याने चैतालीचा गळा दाबून नंतर तिला गळफास दिल्याचे तपासात पुढे आले आहे. संशयिताला जयगड पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
चैताली संतोष पांचाळ (वय 19, रा. नांदिवडे आंबवाडी, रत्नागिरी) ही एका मेडिकल दुकानात कामाला होती. शनिवार 23 एप्रिल रोजी रात्री 8.30 वा.दुकान बंद करुन ती घरी निघाली होती. परंतु रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांना तिचा शोध घेतला असता ती घराजवळच्या आंब्याच्या बागेत झाडाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली होती. याचा तपास पोलिसांनी करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. चैताली आणि समीरचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. याबाबत दोघांच्याही नातेवाईकांना माहीत होते. परंतु 2 महिन्यांपूर्वी चैताली आणि समीरमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून त्यांचे प्रेमसंबंध तुटले होते.
चैताली ही जयगड येथील विधी पालकर यांच्या साई कृपा मेडिकलमध्ये कामाला होती. तिला नेहमी विधी पालकर ही 8 ते 8.30 वा.सुमारास त्यांच्या दुचाकीवरून नांदिवडे आंबवाडी धारेवर सोडायची. तेथून चैताली चालत घरी जायची. दरम्यान, प्रेमसंबंध तुटल्यानंतर समीर चैतालीला अधूनमधून भेटण्याचा व पाठलाग करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु चैताली त्याला भेटत नव्हती. त्यामुळे समीरच्या मनात तिच्याबद्दल राग निर्माण झालेला होता. 23 एप्रिल रोजीही समीर चैतालीला एकटीला भेटण्यासाठी आंबवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ वाट पाहात बसलेला होता. तेव्हा 8.30 वा. चैताली टाकीच्या समोरील रस्त्यावरून काळोखातून एकटीच चालत जात असताना समीरने तिच्याकडे प्रेमाची विनवणी केली. परंतु चैतालीने त्याला नकार दिल्याने समीरने रागाच्या भरात तिचा गळा दाबला. तिला उचलून रस्त्याच्या बाजूला असलेल्या शरद सुर्वे यांच्या आंबा बागेत नेऊन तिच्या गळ्याला ओढणीचा फास अडकवून आंब्याच्या झाडाच्या फांदीवरून ओढणी टाकून तिला लटकवून ठार केले. याप्रकरणी जयगड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून समीरला बुधवारी सकाळी 7.30 वा.अटक केली.