रत्नागिरीत रिक्षा चालकाला मारहाण
रत्नागिरी : किरकोळ कारणातून रिक्षा चालकाला लोखंडी फाईट आणि सुरीने मारून जखमी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शुक्रवार 22 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 6.15 वा. कालावधीत भुतेनाका ते मिर्या जाण्यार्या रस्त्यावर घडली.
विशाल भोळे, त्याचा भाऊ आणि इतर दोन जण अशा चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात राजेश विश्वनाथ तोडणकर (वय 44, राहणार भाटिमिर्या, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी तोडणकर आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन भुते नाका येथून जात होते. त्यावेळी विशाल भोळेसोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर ते झाडगाव झोपडपट्टी येथील दोन प्रवाशांना मिर्या येथे घेऊन जात होते. तेव्हा विशाल आणि त्याच्या भावाने तोडणकर यांच्या रिक्षेसमोर आपल्या दुचाकी आडव्या लावून रिक्षा थांबवली.
तोडकर यांना रिक्षेबाहेर काढून विशालने लोखंडी फाईट त्यांच्या डोक्यात मारली तर त्याच्या भावाने त्यांच्या डोक्यावर सुरीने दुखापत केली. विशाल आणि त्याच्या भावासोबत आलेल्या अन्य दोघांनीही राजेश तोडणकर यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल पालांडे करत आहेत.