महाराष्ट्रात कुठेही नाही, पण रत्नागिरी सिव्हिलला मिळाले ‘बायोकेमिस्ट्री ऑटोमेटेड अॅनालायझर’ मशीन
रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात बायोकेमिस्ट्री फुल्ली ऑटोमेटेड अॅनालायझर एक्सएल 640 मशीन उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्रातील एकाही जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये हे मशीन अद्याप उपलब्ध नव्हते. मात्र हे मशिन रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाले आहे. यामुळे आता महत्त्वाच्या रक्त तपासण्यांसाठी खासगी सेंटरची मदत सिव्हीलला यापुढे घ्यावी लागणार नाही. हे मशीन रुग्णांच्या सेवेसाठी खुले करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात यापूर्वीही लॅब होती. मात्र सर्व सुविधांयुक्त नव्हती. आता आधुनिक मशिनरी उपलब्ध करून देण्यात आले असून निश्चितच ज्या खर्चिक तपासण्या रुग्णांना बाहेर कराव्या लागत होत्या, त्या आता सिव्हीलमध्येच उपलब्ध होणार आहेत. या पॅथॉलॉजीमध्ये आवश्यक कर्मचारी वर्गसुध्दा भरण्यात आला आहे. त्यामुळे आता रुग्णांना वेळेत आणि सर्व तपासण्या एकाच लॅबमध्ये करून मिळणार आहे. यामुळे येथील रुग्णांचे शेकडो रुपये वाचणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या या कार्याचा दिलासा येथील रुग्णांना मिळणार आहे.