‘भल गो भाई’च्या जल्लोषात केळशीचा रथोत्सव संपन्न
केळशी (दापोली) धीरज वाटेकर -: शांत समुद्रकिनारा लाभलेल्या येथील प्रसिद्ध स्वयंभू महालक्ष्मी मंदिराचा श्रीहनुमान जन्मोत्सव दिनी, चैत्री पौर्णिमेला होणारा वार्षिक यात्रोत्सव निमित्ताने संपन्न होणारा प्रसिद्ध रथोत्सव ‘भल गो भाई’च्या जल्लोषात संपन्न झाला. केळशीचे महालक्ष्मी मंदिर वास्तू पेशवेकालीन आहे. चैत्रशुद्ध अष्टमी ते चैत्र पौर्णिमा कालावधीत मंदिरात हा उत्सव संपन्न होतो. जत्रोत्सवातील विविध समाजाचे मान ठरल्याप्रमाणे पार पडले.
कोरोना कारणे मागील दोन वर्षे रथाला खांदा लावण्यास न मिळालेली भाविक आणि ग्रामस्थ मंडळींनी उत्सवाला गर्दी केली होती. रथाला खांदा लावण्यासाठी अनेकांची झुंबड उडाली होती. रथ मागे-पुढे होतानाची खेचखेची कितीही त्रासदायक वाटली तरी ‘सर्वा मुखी जगदंबेचा उदोssss’ सुरु राहिला. दिवसभराच्या रथोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण केळशी गावातून फेरफटका मारणाऱ्या अनेकांच्या नजरेत अलिकडच्या काळात गावच्या ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे भरत होती, आपले अस्तित्व दाखवत होती. यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी मंदिरात दुपारी गावजेवण संपन्न झाले.
सुमारे सात हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रीमहालक्ष्मीच्या स्वयंभू मूर्तीला यात्रोत्सवाच्या निमित्ताने चढवलेला मुखवास आकर्षक होता. मुखवास म्हणजे देवीचा सोन्याचा तयार केलेला मुखवटा होय. देवीची १२ तासांची रथयात्रा निघण्यासाठी सागवानी लाकडाचा रथ सजविण्यात आला. हा रथ खांद्यावर वाहून नेतात त्यापैकी असतो. या रथाला चार दांडे असतात.
यात्रोत्सवाच्या दिवशी पहाटे कीर्तन आटपल्यावर गावातून रथ फिरायला सुरवात झाली. रथाच्या मखरात श्री महालक्ष्मीची मूर्ती बसवण्यात आली. गावात रथ फिरायला सुरुवात झाल्यावर पुढे पुजारी व मागे उभे असलेले भालदार-चोपदार विशिष्ट पेहेरावात सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रथाची आकर्षक सजावट लक्षवेधक होती. दिवसभर गावातून रथ फिरल्यावर सायंकाळी सूर्यास्तसमयी रथ पुन्हा देवळात आणण्यात आला. तत्पूर्वी देवी (रथपुतळी) सोडवून ती देवळात नेण्यात आली. त्यानंतर रथावर उठबर्या उभा राहिला होता. रथाच्या प्रतिक्षेत भक्त देवळाभोवताली जमले होते.
वृत्तलेख आणि छायाचित्रे – धीरज वाटेकर
व्हिडिओ पहा👇