मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दररोज पाच तास बंद ठेवणार : ना. उदय सामंत यांची माहिती
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटाचे रुंदीकरण करण्यासाठी वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 20 एप्रिलपासून दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय 19 रोजी घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चिपळुणातील पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतची तातडीची आढावा बैठक झाली. पावसाळ्यापूर्वी घाटातील कामे तातडीने करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, परिवहन व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाहतूक बंद करून समस्या निर्माण होतील. त्यामुळे ही दुपारची वेळ निवडण्यात आली आहे. लोटे एमआयडीसी व स्थानिकांची अडचण होऊ नये म्हणून दिवसभरातील फक्त पाच तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे ना. सामंत यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय सध्या झालेला नाही.