परशुराम घाटात वाहतूक थांबवून काम पूर्ण करण्याचे नियोजन-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि. 15 : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भुस्खलन होवू नये व रुंदीकरण गतीने व्हावे यासाठी 20 एप्रिल पासून दुपारी 12 ते 5 यावेळेत वाहतूक थांबवून उन्हात काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत अंतिम निर्णय 19 एप्रिल रोजी घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
याबाबत आज तातडीच आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग तसेच परिवहन व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या आंब्याचा हंगाम आहे. त्यामुळे या कालावधीत वाहतूक बंद करुन अडचण होईल म्हणून ही भर उन्हाची वेळ निवडण्यात आली आहे. साधारणपणे या वेळेत आंबा वाहतूक होत नाही. म्हणून असे नियोजन करण्याचे ठरले आहे.
घाटातील काम गतिमान पध्दतीने व्हावे यासाठी येथे उत्खनन करणाऱ्या यंत्रांची संख्या वाढविण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी यावेळी दिले.