
हेल्मेट सक्ती रद्दच्या निर्णयावरून रत्नागिरीकरांमध्ये संभ्रमाची स्थिती, पोलिसांकडून अद्यापही दंडाची वसुली, श्रेयासाठी चढाओढ!
उच्च तंत्र व शिक्षणमंत्री यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार सध्या हेल्मेट सक्तीपासून नागरिकांना दिलासा मिळेल असे वाटत आहे. मात्र जिल्हाधिकार्यांनी दि. ३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात हेल्मेट सक्ती रद्द केल्याचा उल्लेख नाही. मात्र नागरिकांना हेल्मेटविषयी प्रबोधन करावे असे या आदेशात म्हटले आहे. मात्र हे प्रबोधन किती दिवस करावे याविषयी कोणताही स्पष्ट खुलासा झालेला नाही.
एक़कीकडे नागरिकांना प्रबोधन करण्याचे परिपत्रकात जाहीर केले असतानाच सर्व सरकारी कर्मचार्यांना मात्र हेल्मेट सक्ती कायम ठेवण्यात आली असल्याचे म्हटले आहे. या सर्व आदेशांमुळे नागरिकांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे. आता पोलीस यंत्रणेलाही सरकारी कर्मचारी कोण? आणि नागरिक कोण? हे आता ओळखावे लागणार आहे. एकीकडे हेल्मेट सक्ती रद्द झाल्याचे जाहीर झाले असले तरी आज सकाळी ट्रॅफीक पोलिसांकडून हेल्मेट न वापरणार्यांकडून दंडाची कारवाई होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत नागरिकांनी पोलिसांना विचारले असता आम्हाला अद्याप कोणताही आदेश आला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आणि या सर्वांमुळेच हेल्मेट वापरावे की नाही आणि न वापरल्यास दंड भरावा लागणार की काय? या भीतीमुळे नागरिकांच्यात गोंधळ निर्माण झाल्याने अनेक नागरिकांनी सध्या तरी हेल्मेट वापरणे पसंत केले आहे.
एकीकडे ही स्थिती असतानाच हेल्मेट सक्ती रद्द करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर आता त्याच्या श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मागणी केल्यानंतर हेल्मेटसंबंधीची अधिकार्यांची सभा मंत्री उदय सामंत यांनी लावली होती व त्यात हा निर्णय झाला होता. मात्र भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी देखील या आधी पोलिसांसह प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांना हेल्मेट सक्ती रद्द करावी असे पत्र दिल्याने हे श्रेय आमचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातच रत्नागिरी व्यापारी महासंघाने देखील या श्रेयवादात उडी घेतली असुन व्यापारी महासंघाने मंत्री उदय सामंत यांच्याकडे हेल्मेट सक्ती रद्द करावी यासाठी पाठपुरावा केल्याने ही हेल्मेट सक्ती रद्द केली असल्याचा दावा करून त्यासाठी सामंत यांचे आभार मानण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे एकीकडे श्रेयवादाची लढाई सुरू असताना सामान्य रत्नागिरीकर मात्र हेल्मेट वापरावे की नाही? या संभ्रमात पडला आहे. मंत्री उदय सामंत आज रत्नागिरीच्या दौर्यावर असून ते याबाबत आपली भूमिका जाहीर करतील असा अंदाज आहे. www.konkantoday.com