राज्यसभेत भा.ज.पा.चे १०० खासदार समान नागरी कायदा दृष्टिपथात – ॲड. दीपक पटवर्धन
राज्यसभेत भा.ज.पा खासदारांची संख्या १०० झाली असून आता राज्यसभेतही बहुमत सहज साध्य आहे. ८८ नंतर प्रथमच कोणत्याही एका पक्षाचे १०० खासदार राज्यसभेमध्ये आहेत.
नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ७ वर्षात अनेक निर्णय हे हिंदुस्थानाच्या राष्ट्रवादी विचारधारेनुरूप घेतले. श्री प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण उपक्रम, काश्मीरचा स्वतंत्र दर्जा रद्द करणारे ३७० कलम रद्द करताना काश्मीरच्या विभाजनाचा निर्णय आर्थिक निकषांवर आधारित १०% आरक्षण, काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा भव्य विकास असे अनेक निर्णय हिंदुस्थानातील बहुसंख्य राष्ट्रप्रेमी जनतेच्या मतानुसार घेतले. जनमानसात या निर्णयामुळे कमालीचा आनंद व समाधान आहे. याचेच प्रत्यंतर ४ राज्यातल्या विधानसभांमध्ये भा.ज.पा.ला प्राप्त झालेल्या विजयामुळे आले.
लोकसभेप्रमाणे राज्यसभेमध्येही बहुमत सहज साध्य झाल्याने आता बहुप्रतिक्षित समान नागरी कायदा धडाडीचे परखड स्वभावाचे गृहमंत्री मा.अमितभाई शहा लवकरच मंजुरीसाठी आणतील आणि नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भा.ज.पा.चे केंद्रसरकार समान नागरी कायदा बहुमतांनी करून घेईल. असा विश्वास कार्यकर्त्यांसमोर बोलताना भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.