लोकांना वेठीस धरू नका,विद्यार्थी व ग्रामीण भागाचे मोठे नुकसान,नवीन भरती करून एसटी तात्काळ सुरू करा!- उदय गोताड
रत्नागिरी:- एसटी संपाबाबत राज्य शासनाने आता भूमिका घ्यायला हवी. परीक्षा काळात एसटी कर्मचारी बस सेवा सुरू ठेऊन सुद्धा आपल्या मागण्यासाठी लढा देऊ शकले असते मात्र विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात न घेता ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरणे चुकीचे असून राज्य शासनाने तातडीने नवी भरती करून ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू करावी अशी स्पष्ट भूमिका गाव विकास समिती मार्फत अध्यक्ष उदय गोताड यांनी मांडली आहे.
जनतेला वेठीस धरणारे संप हे लोकशाहीला घातक आहेत.ज्या हेतून एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे त्याच हेतूला या संप काळात हरताळ फासण्यात आला आहे.या संपाच्या माध्यमातून काहीजण राजकिय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असतील तर ते दुर्दैवी आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा काळात तालुक्याच्या ठिकाणी परीक्षांना यावे लागते.काही ठिकाणी परीक्षा केंद्र ही वाडी वस्त्यांपासून दूर असतात.अशा स्थितीत संप करून गाड्या बंद ठेवणे हे योग्य नाही असेही उदय गोताड यांनी म्हटले आहे.एसटी कर्मचारी यांना शासनाने न्याय दिला पाहिजे ही आमचीही भूमिका आहे, मात्र एकाला न्याय देत असताना ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरणे आम्हाला मान्य नाही असेही उदय गोताड यांनी म्हटले आहे.सरकारने एसटी संपावर तातडीने तोडगा काढून बस सेवा ग्रामीण भागात सुरू करावी,ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यासाठी नवीन भरती तातडीने करावी.किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून परीक्षा काळात शासनाने खासगी बस सेवा ग्रामीण भागात सुरू कराव्यात अशी मागणी उदय गोताड यांनी केली आहे.