नोकरीचेआमिष दाखवत परीक्षा घेतली, पैसे घेतले अन् तो फरार झाला…
रत्नागिरी : राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरणामध्ये शिपाई व लिपिक पदाच्या भरतीसाठी शहरातील एका शाळेत लेखी परीक्षा घेतली, उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले आणि 13 जणांना लाखोंचा गंडा घालून त्याने पोबारा केला. आता म्हणे तो फोनही उचलत नाही आणि जयगड येथील राहत्या घरात राहतही नाही. अशी स्थिती ओढवलेल्या परीक्षा देणार्यांनी शेवटी गणपतीपुळे पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार अर्ज दिला. आता पोलिस याचा तपास कसा करणार? याकडे लक्ष लागले आहे. पाटील (रा.जयगड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याने या 13 जणांना राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरणामध्ये शिपाई व लिपिक पदासाठी सर्वांना नोकरी देतो, असे सांगून सगळ्यांकडून लाखोंची रोख रक्कम घेतली. त्यानंतर 13 मार्च रोजी या सर्वांची शहरातील एका शाळेत 11 ते 1.30 वा. या वेळेत लेखी परीक्षा घेतली. 5 ते 6 दिवसांची परीक्षेचा निकाल लागेल असे सांगितले. तसेच 5 एप्रिलपासून कामावर हजर व्हावे लागेल व तुमचे 1 महिन्याचे ट्रेनिंग होईल, असेही त्याने सांगितले होते. पण निकालही लागेना आणि त्याचा फोनही लागेना अशी स्थिती झालेल्या परीक्षार्थींनी शेवटी पोलिस ठाणे गाठत तक्रार केली आहे.