रत्नागिरीतील उद्योजक योगेश मुळ्ये यांना केबीबीएफ ग्लोबलचा अचिवर्स अवॉर्ड
रत्नागिरी : रत्नागिरीतील उद्योजक, कॉम्प्युटर कन्सेप्टसचे सर्वेसर्वा योगेश मुळ्ये यांना कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन (केबीबीएफ) ग्लोबलचा अचिवर्स अवॉर्ड सन्मान पुण्य़ामध्ये सुपुर्द करण्यात आला. केबीबीएफ ग्लोबल मीटिंगमध्ये हा पुरस्कार जनता बँकेचे संचालक सीए सुहास पंडित यांच्या हस्ते व माजी संपादक विजय कुवळेकर, जोशी बिल्डर्सचे कौस्तुभ कळके, तसेच केबीबीएफचे ग्लोबल अध्यक्ष श्री. अमित शहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
व्यवसाय उभारणी, त्यासाठी केलेली मेहनत, व्यवसायाचे नियोजन, एकूण उलाढाल, तसेच संस्थेसाठी केलेलं काम, संस्था वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न हे निकष लावून पुरस्कार देण्यात आले. संस्था सुरू झाल्यापासून अशाप्रकारे पहिल्यांदाच पुरस्कार देण्यात आला. २०१३ पासून कार्यरत कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन ही कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांची संघटना असून तिचे ठाणे, पुणे, डोंबिवली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे पाच विभाग आहेत. कोरोना कालावधीनंतर पहिलीच मीटिंग होती व त्यात महाराष्ट्रमधून दोनशेपेक्षा जास्त कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक एकत्र आले होते. यामधून पाच व्यावसायिकांना अचिव्हर्स अवॉर्ड देऊन सन्मानित केले.
श्री. मुळ्ये यांनी २०१६ मध्ये पितांबरी उद्योग समूहाचे श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रेरणेने रत्नागिरीत केबीबीएफची सुरवात केली. रत्नागिरी परिसरातील अनेक गावांत मीटिंग घेऊन कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांना संस्थेमध्ये सामील करून घेतले. संस्थेमार्फत नियमित मासिक मीटिंग आणि ग्लोबल मिट मधून अनेक छोट्या व्यवसायिकांना पुढे येण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन ते देतात.
योगेश मुळ्ये म्हणजे कन्सेप्टस हे समिकरणच बनून गेले आहे. 1999 साली श्री. मुळ्ये यांनी व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेल्या २३ वर्षांत व्यवसायाची नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत केली. सुरवातीला भाड्याचे छोटे दुकान, काही वर्षांनंतर नव्या जागेमध्ये व्यवसायाचे स्थलांतर केले.
2014 मध्ये कोकणातील पहिले आणि महाराष्ट्रातील आठवे डेल एक्सलुसिव्ह स्टोअर सुरू केले. 2017 मध्ये कोकणातील एकमेव एचपी वर्ल्डची सुरवात केली. या दोन्ही स्टोअरला बेस्ट परफॉर्मर स्टोअरचा मान अनेकवेळा प्राप्त झाला आहे. 2021 साली कोकणातील सर्वात मोठी आयटी डीलरशिपच्या स्वरूपात १५०० चौरस फुटाच्या प्रशस्त शोरूम सुरू केले. केबीबीएफच्या मीटिंगमधून संकल्पना घेऊन २०१८ मध्ये ई- मँगोज नावाने कोकण प्रोडक्ट ट्रेडिंगसाठी अॅप सुरू केले.