कोरोना विळखा सैल झाल्याने पारंपरिक सणांवरील निर्बंध हटवले शिमगोत्सव साजरा करण्यासाठी ग्रामस्थ व चाकरमानी एकवटले


खेड : गेले दोन वर्ष अजस्त्र कोरोनाचा अजगर विळखा घालून बसल्याने नागरिकांना जगणे असह्य झाले होते. पारंपरिक सण, तीर्थस्थळांचे दर्शन, पर्यटन,  हॉटेलिंग, शिक्षण, क्रीडा, संस्कृती कार्यक्रम, राजकीय मेळावे सारे काही शासकीय निर्बंधांमध्ये होते. त्यामुळे सगळीकडे एक प्रकारचे नैराश्य पसरले होते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थती कधीतरी सुधारेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली असतानाच आता ही परिस्थिती बदलताना दिसत आहे. कोरोना अजगराचा विळखा आता सैल झाला असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. कोरोना काळात लादण्यात आलेले निर्बंधही आता सैल झाले असल्याने शिमगोत्सवासारखे पारंपरिक सण आता उत्साहात साजरे करता येणार असल्याने भक्तांच्या आनंदला पारावर उरला नाही
महाराष्ट्राला मोठ्या सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या राज्य विविध पारंपरिक सण मोठ्या जल्लोषात साजरे केला जातात. यामध्ये गणेशोत्सव, शिम्गतोत्सव, दिवाळी, यासारख्या अनेक सणांचा समावेश आहे. साऱ्यांनी एकत्र येऊन असे सण जल्लोषात साजरे होतात. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे एकही सण साजरा करता  आलेला नव्हता. शिमगोत्सव, गणेशोत्सव परंपरा म्हणून साजरे करण्यात आले मात्र पाठीवर सतत कोरोनाची भीती असल्याने हे सण साजरे करताना कोणताही उत्साह किंवा जल्लोष नव्हता. केवळ सोपस्कार म्हणून सण साजरे केले गेले त्यामुळे जिकडे तिकडे नैराश्य भरून राहिले होते.
मार्च २०२० मध्ये महाराष्ट्रात कोरोनाची एन्ट्री झाली. बघता बघता कोरोनाचा विळखा अवघ्या महाराष्ट्राला पडला आणि गेली दोन वर्षे कोरोनाच्या अजस्त्र अजगराने नागरिकांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. अवघ्या महाराष्ट्राला विळखा घातलेला हा अजगर इतका भयानक होता की त्याने अनेकांचे संसार, नोकऱ्या, रोजगार गिळंकृत केले. अवघ्या जगाला पडलेला हा अजस्त्र अजगराच्या विळखा कधीच सैल होणार नाही अशीच परिस्थिती असतानाच या अजगराच्या विळखा सैल करण्यात आपल्याला यश आले आहे. मानवजातीसाठी खरोखरच हे समाधानाची बाब आहे.
गेल्या काहीं महिन्यांपासून कोरोनाच्या अजगराच्या विळखा सैल होताना दिसत आहे. हा विळखा सैल करण्यामध्ये शासनाप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांचेही मोठे योगदान आहे. कोरोनाच्या अजगराला ठेवण्यासाठी शासनाने केलेल्या निर्बंधाचे सर्वसामान्य नागरिकांनी पालन केल्यामुळेच कोरोना अजगराला ठेचणे शक्य झाले आहे.
थोर संगतीकर सुधीर फडके यांच्या ‘फिटे आदराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश’ या गीताप्रमाणे कोरोनाचा अंधार फिटून आता सर्व जगतावर प्रकाश पसरू लागला आहे. त्यामुळे वातावरणात भरलेले नैराश्य आता दूर होताना दिसत आहे. कोरोना अजगराच्या विळखा सैलावताच शासनाने निर्बंधांमध्येही शिथिलता आणल्याने शिमगोत्सवासारखा पारंपरिक सण साजरा करणे सहज शक्य झाले आहे. सलग दोन वर्षांनंतर शिमगोत्सवाचे ढोल पूर्वीसारखे बडविले जाणार असल्याने गावागावात एक वेगळाच उत्साह पाहावयास मिळू लागला आहे.
शिमगोत्सव हा सण ग्रामदेवतेवर असलेल्य श्रद्धेशी निगडीत आहे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या भक्तांसाठी हा सण अतिशय महत्वाचा आहे. मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी व्यवसायासाठी स्थायिक झालेले चाकरमानी शिमगोत्सवादरम्यान आपल्या कुटुंबासह गावी येत असतात. या दरम्यान गावातील सहाणेवर मुक्कामाला असलेल्या ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना भक्तांना मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. गेली दोन वर्ष या आनंदापासून  सारेच वंचित होते. सोशल डिस्टंशिंगच्या निर्बंधामुळे भक्तांना एकत्र येऊन पालखी नाचविण्याचा आनंद लुटता आला नव्हता. यावर्षी मात्र ग्रामदेवतेची पालखी नाचवण्याचा मनमुराद आनंद लुटता येणार असल्याने ग्रामदेवतेच्या भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला पाहावयास मिळत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button