
संगमेश्वर तालुक्यातील विविध भागात सध्या रान गव्यांचा धुमाकूळ
संगमेश्वर तालुक्यातील विविध भागात सध्या रान गव्यांनी धुमाकूळ घातला असून सह्याद्री पर्वतरांगांमधून तळकोकणात उतरलेल्या या गव्यांनी रब्बी पीके मोठ्या प्रमाणावर फस्त केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या गव्यांचा बंदोबस्त कसा करायचा? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. वनविभागाला मोठ्या संख्येने असणाऱ्या रानगव्यांसह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे शक्य नसल्याने नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाला आर्थिक नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात सह्याद्री पर्वतरांगेतील जंगलात वास्तव्याला असणारे रान गवे पाण्याची कमतरता भासू लागल्यानंतर तळकोकणातील शृंगारपूर, वाशी, दख्खन आदि गावात खाली उतरतात. या गव्यांचे वेगवेगळे कळप असल्याने हे कळप हळूहळू आजूबाजूच्या गावात खाद्य मिळविण्यासाठी आणि पाण्यासाठी रात्रीच्या वेळी जातात. शेतात मोठ्या संख्येने घुसणारे गवे एकाचवेळी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात.संगमेश्वर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी आंबवली मराठवाडीत एक रानगवा रात्रीच्या वेळी विहिरीत पडल्याची घटना घडली होती. वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने या गव्याची सुखरुप सुटका केली असली तरीही वन्यप्राण्यांचा मानवी वस्ती जवळ वावर वाढल्याचा हा पुरावाच आहेसंगमेश्वर तालुक्यातील वाशी, मुचरी, तेऱ्ये, लोवले, शिवने आदी गावात मोठा धुमाकूळ घातला असून कुळीथ, तूर, चवळी, पावटा, मटकी या रब्बी पिकांसह विविध भाजीपाला फस्त करून मोठे नुकसान केले आहे. सध्या कुळीथ आणि पावटा ही दोन रब्बी पिके अगदी काढणी योग्य झाली असतांना गव्यांनी शेतात घुसून ही पिके फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत
www.konkantoday.com