‘लोटिस्मा आणि मसाप’ चिपळूणतर्फे ‘अपरान्तायन’ दृकश्राव्य मालिका
बोली, लोककला आणि साहित्यातून फागपंचमी ते धूलीवंदन काळात रंगणार मराठी माती आणि माणसांशी अनोखा संवाद
चिपळूण : ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा’ असं कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे. प्राचीन, अर्वाचीन राजभाषा मराठीचा हाच धागा पकडून येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या बोली, भाषा आणि संस्कृतीचा वेध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘अपरान्तायन’ या दृकश्राव्य मालिकेची निर्मिती केली आहे. दहा नामवंत अभ्यासकांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही वैशिष्ट्यपूर्ण मालिका महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूणच्या maharashtra sahitya parishad chiplun या यु-ट्युब चॅनेलवरून फागपंचमी (७ मार्च) ते धूलीवंदन (१८ मार्च २०२२) कालावधीत प्रसारित केली जाणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कथाकार प्रा. संतोष गोनबरे हे ‘अपरान्तायन’ या दृकश्राव्य मालिकेचे संकल्पक, संवादक आणि दिग्दर्शक आहेत. ‘संत साहित्याची भाषा’ या विषयाची मांडणी प्रवचनकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक धनंजय चितळे यांनी केली आहे. तर कीर्तनकार अंजली बर्वे यांनी ‘संस्कार आणि संस्कृती’ हा विषय उलगडला आहे. ‘बोली आणि तिल्लोरी बोली’ या विषयावर नामवंत कवी आणि समीक्षक अरुण इंगवले यांनी अत्यंत मार्मिक विवेचन केले आहे. निसर्गात रमणारे पत्रकार आणि लेखक धीरज वाटेकर यांनी ‘किल्ल्यांची देहबोली’ या विषयाची मांडणी केली आहे. साहित्य आणि नाट्यक्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेली ‘वीररसाची बोली’ शाहीर शिवाजी शिंदे यांच्या आवाजात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. ‘मुस्लीम बोली’ची विशेषता अभ्यासक महंमद झारे यांनी मांडली आहे. भारतभर बोलली जाणारी आणि राजस्थानी प्रभाव असलेली बंजारा बोली ही बंजारा समाजाची समृद्ध मायबोली आहे. ही बोली लेखक-शिक्षक चंद्रकांत राठोड यांनी उलगडली आहे. आंबेडकरी जलशांना एक विशेष परंपरा आहे. या जलशांतून शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचून लोकजागृती केली जाते. या चळवळीला खेडोपाडी घेऊन जाणारे लेखक, कवी, शाहीर आणि गायक म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले राष्ट्रपाल सावंत यांनी ‘जलसा आणि गीतांची बोली’ या विषयाची मांडणी केली आहे.
भाषेचे अनेक पैलू असतात. भाषा अनेक बोलींनी संपन्न होत असते. बोली ही कोसाच्या अंतरावर बदलते. ‘छपन्न भाषांचा केलासे गौरव’ असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे. ‘अपरान्तायन’ दृकश्राव्य मालिका अशा बोली भाषांचा वेध घेणारी आहे. ‘आपली मऱ्हाठी’ अधिक समृध्द करणारा हा उपक्रम आहे. कोकणच्या लाल मातीतील साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा वेध घेणारा हा उपक्रम आहे. अपरान्ताची बोली, सणवार, रितीरिवाज, परंपरा, उत्सव आदींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न यामागे आहे. ‘अपरान्तायन’ दृकश्राव्य मालिका पाहाण्यासाठी आणि या विषयातील अभ्यासक पुढील उपक्रमांतील सहभाग नियोजनाच्यादृष्टीने अधिक माहितीसाठी ९४२३२९१४८५ या भ्रमणध्वनीवर संपर्क करू शकतात. बोली आणि भाषेसोबत त्या त्या समूहाची संस्कृती आणि मूल्यांची ओळख होत जात असते. याची पुरेपूर जाणीव करून देणारी ‘अपरान्तायन’ दृकश्राव्य मालिका ही निश्चित आनंददायी असल्याने या होलिकोत्सवात होणारे तिचे प्रसारण अभिरुचीसंपन्न साहित्य रसिकांनी अवश्य अनुभवावे असे निवेदन ‘लोटिस्मा आणि मसाप’ चिपळूणतर्फे करण्यात आले आहे.
www.konkantoday.com