रत्नागिरीची पोस्ट पेमेंटस् बँक देशात ठरली प्रथम

हरचेरीचे शाखा डाकपाल विश्वनाथ लिंगायत देशात अव्वल

रत्नागिरी:- भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेमार्फत आयोजित भारत बिल पेमेंटस् सर्व्हिस (बीबीपीएस) दिवाळी धमाका-२०२१ या देशभरात आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेने अभूतपूर्व व ऐतिहासिक कामगिरी केली. या संपूर्ण स्पर्धेत रत्नागिरी टपाल विभागाने सुरुवातीपासूनच प्रथम क्रमांकावर आपले स्थान टिकवून ठेवले होते.

या स्पर्धेत अंतिम क्षणापर्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत विश्वनाथ लिंगायत (शाखा डाकपाल हरचेरी, शाखा डाकघर लांजा उपविभाग) यांनी संपूर्ण देशभरात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच राजेश उतेकर (शाखा डाकपाल चोरवणे (धामणंद) शाखा डाकघर चिपळूण उपविभाग) यांनीही पाचवे स्थान पटकावून संपूर्ण देशपातळीवर रत्नागिरी टपाल विभागाचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेसाठी पहिल्या ५ विजेत्यांना मानाच्या स्कूटी देण्यात येणार असून पाचपैकी २ स्कूटी रत्नागिरी टपाल विभागाला मिळाल्या आहेत.

या संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही शाखा डाकपालांनी पूर्ण कालावधीत जवळपास ७५०० पेक्षा अधिक वीज बिलांचे बिल पेमेंटचे व्यवहार केले. या स्पर्धेत त्यांना संजय वाळवेकर (सहायक अधीक्षक चिपळूण उपविभाग), संदीप माथूर (डाक निरीक्षक लांजा उपविभाग) तसेच इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेचे अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अभूतपूर्व यशाबद्दल डाकघर अधीक्षक आ. ब. कोड्डा यांनी दोघांचेही विशेष कौतुक केले आणि सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदनही केले.

या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने रत्नागिरी विभागातील सर्व शाखा टपाल कार्यालयांत इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेच्या माध्यमातून वीज बिल भरणा सुविधा पुन्हा सुरू झाली. सोबतच बिल पेमेंटच्या इतर विविध सुविधा देखील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी त्यांच्याजवळच्या शाखा डाकघराशी तसेच त्यांच्या भागात येणाऱ्या पोस्टमनशी संपर्क करावा आणि सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. ब. कोड्डा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button