कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे “भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र” असे नामकरण रविवारी कार्यक्रम
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या (रामटेक) रत्नागिरी उपकेंद्राचे “भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र “असे नामकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू मधुसूदन पेन्ना उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मराठी भाषा दिनी रविवारी (ता. २७) दुपारी २ .०० वाजता रत्नागिरी उपकेंद्र अरिहंत मॉल येथे होणार आहे.
मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे येथे विश्वविद्यालयाचे उपकेंद्र सुरू झाले. तसेच उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री सामंत यांनी या उपकेंद्राला भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे नाव देण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार हे नामकरण होणार आहे. भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला. परंतु जिल्ह्यात त्यांच्या नावे कोणतेही अध्ययन अथवा संशोधन केंद्र सध्या अस्तित्वात नाही. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रास स्थान प्राप्त झाले आहे त्या ठिकाणी पूर्वी १८६३ मध्ये स्थापन झालेली शासकीय इंग्रजी माध्यमाची शाळा होती. डॉ. काणे हे या शाळेमध्ये सन १९०४ च्या सुमारास काही काळ अध्यापक होते. या अर्थी त्यांचा उपकेंद्राच्या वास्तूशीदेखील जवळचा संबंध आहे. डॉ. काणे यांनी संस्कृत व संस्कृतेतर क्षेत्रातही भरीव असे योगदान दिले आहे. त्यामुळेच त्यांच्याप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून या अध्ययन केंद्रास डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे नाव देण्यात येत आहे. या नामकरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आणि कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी यांनी केले आहे.
या उपकेंद्राच्या माध्यमातून कोकण व आजूबाजूच्या भागामध्ये संस्कृत विषयाच्या शिक्षणाला व संशोधनाला प्रोत्साहन, संस्कृतच्या माध्यमातून कोकणातील परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत कोकणातील संस्कृतीचा विकास व परंपरांची जपणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच कोकणच्या देवभूमीला संस्कृत भाषेच्या माध्यमातून शिक्षणाचे केंद्र बनवणे, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या व संस्कृत क्षेत्रातील संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे, संशोधकांकरीता नवीन व्यासपीठ निर्माण करणे, ऑनलाईन अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणे आणि स्थानिकांच्या सहयोगाद्वारे, प्रचाराद्वारे या केंद्राचा स्वयंपूर्ण केंद्र म्हणून विकास साधणे ही या उपकेंद्राची उद्दिष्टे आहेत.