
जिल्ह्यात शुक्रवारी ओबीसींसाठी मोर्चा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह दोन मंत्री करणार नेतृत्व
रत्नागिरी : केंद्र सरकारने ओबीसींवर अन्याय केला असून त्या विरोधात आवाज उठवत राज्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून शुक्रवारी 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह दोन मंत्री या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस भवनमध्ये ही पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, भंडारी समाज राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, सुजित झिमण, दीपक राऊत, तालुकाध्यक्ष विकास पाटील, हारीश शेकासन, कपिल नागवेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भानुदास माळी म्हणाले की, ओबीसींच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी कोकणवासीयांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता काँग्रेसभवन येथे मेळावा होईल. त्यानंतर दुपारी काँग्रेस भवन, मारुती आळी, एसटी बसस्थानकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला वंदन करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.