कुडाळमध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांची गाडी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रोखली आणि….
कुडाळ : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडी दरम्यान शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन राडा झाला. नगरपंचायतीकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केला असताना आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी आपली गाडी आणल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ती रोखली. या प्रकारावरून शिवसेना-भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे प्रकरण शांत झाले.
येथील नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. यावेळी त्या ठिकाणी महाविकास आघाडीची वर्णी लागली. दरम्यान या निवड प्रक्रियेवेळी नगरपंचायतीकडे जाणारा मार्ग पोलिसांकडून बंद करण्यात आला होता. त्या ठिकाणी गाडी नेण्यास मनाई होती. मात्र नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांना घेऊन आ. नाईक यांनी बंद असलेल्या मार्गात आपली गाडी घातली. यावेळी संतप्त भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाईक यांची गाडी रोखत, तुम्हाला गाडी घालण्यास कोणी परवानगी दिली ? असा सवाल केला. या प्रकारावरून शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत होऊन त्या ठिकाणी राडा झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत प्रकरण शांत केले.
www.konkantoday.com