कोकणच्या हापूससह लोकजीवनाचा राष्ट्रपतींकडून गौरव
मंडणगड : महामहीम राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी आंबडवे येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणच्या हापूसचे आणि येथील माणसांमध्ये असलेल्या आपुलकीचे कौतुक केले.ज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याचा गोडवा देशभरच नव्हेतर विश्वात पसरला आहे, त्याचप्रमाणे येथील माणसांमधील आपल्याला आज गोडवा पाहायला मिळत आहे. येथील निसर्ग आणि येथील माणसे पाहून आपल्याला आनंद झाला. हाच गोडवा आपल्याला आंबडवेत बघायला मिळत आहे. भविष्यात केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून येथे भव्य स्मारक होऊन आंबडवेचा गोडवा विश्वभर पसरावा, अशी अपेक्षा कोविंद यांनी व्यक्त केली. कोकणच्या निसर्ग सौंदर्यासह येथील लोकजीवन व हापूसचा गौरव त्यांनी यावेळी केला.