लवकरात लवकर तोडगा काढून सामान्य जनतेची एसटी वाहतुक सुरू करावी ,ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
एस.टी. कर्मचारी यांच्या बंदमुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ तोडगा काढून एस .टी . वाहतूक सुरू करून तसेच एसटी कर्मचारी यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढून सामान्य जनतेची एसटी वाहतुक सुरू करावी यासाठी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील नागरिक आणि एस टी. कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटल्याप्रमाणे सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच इतर मागास प्रवर्गावर गेले कित्येक वर्ष शासनाकडून अन्याय होत आलेला आहे . या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात ओबीसी संघर्ष समिती संघटनात्मक काम करीत आहे . संघर्ष समितीच्यावतीने लोककल्याणकारी विविध उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबवण्यात आले आहेत . संपूर्ण महाराष्ट्रात गेले तीन महिने एस.टी. कामगार सनदशिर मार्गाने आपल्या मागण्या शासनाकडून पदरात पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत . मात्र गेले तीन महिने जैसे थे परिस्थिती आहे . कोरोनाच्या काळात व्यवसाय ठप्प झाले होते . आता कुठे जनजीवन सुरळीत होत आहे तर सामान्यांची लालपरी बंद पाडून शासनाने सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे . एस.टी. कर्मचारी यांच्या बंदमुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे . अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत . रोज पाच दहा किलोमीटर पायपीट करून सामान्य जनता औषधोपचार , बाजारहाट व नोकरी निमित्त येतात . शाळा कॉलेज सुरू होऊनही विद्यार्थी एस.टी. बंद असल्याने पोहचू शकत नाही . त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . ग्रामीण भागातून महत्वाच्या कामासाठी शहरात येणाऱ्या सामान्य जनतेला खाजगी वाहतूकीस जादा पैसे मोजून यावे लागते . त्यामुळे अधिक भुर्दंड पडत आहे . तसेच व्यापारी वर्ग ही हवालदिल झाला आहे .
www.konkantoday.com