महामार्गाचे काम सुरू असताना भलामोठा दगड घरंगळत शिरला घरात
चिपळूण तालुक्यातील पेढे बौद्धवाडीत घडला प्रकार; यंत्रणेसह आ. शेखर निकम यांनी केली पाहणी
चिपळूण : परशुराम घाटामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी डोंगर कटाई सुरू झाली आहे. या ठिकाणी काम सुरू असताना गुरुवारी (दि.3) दुपारी 12:30 वा. अचानक एक भलामोठा दगड घरंगळत गेला आणि घराला भगदाड पाडून घरात घुसला. सुदैवाने या घरात कोणी राहात नसल्याने मोठा अनर्थ टळला. पेढे बौद्धवाडीत घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत पेढेचे सरपंच प्रवीण पाकळे, पोलिसपाटील वैष्णवी पाणकर, पं. स. सदस्या ऋतुजा पवार, विश्वास सुर्वे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. याबाबत चिपळूण पोलिस, राष्ट्रीय महामार्ग विभाग, तहसीलदार, प्रांताधिकारी यांना तत्काळ माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच आ. शेखर निकम तत्काळ पेढेमध्ये दाखल झाले. त्यांनीही या ठिकाणी पाहणी केली आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग, संबंधित ठेकेदार कंपनी व ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली.