
लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर कंपनीचा कचरा उघड्यावर
वसाहत परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर या रासायनिक कंपनीच्या युनिट ३ च्या व्यवस्थापनाने रासायनिक कचरा उघड्यावर टाकला असल्याने या परिसरात प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुष्कर कंपनीच्या व्यव्यस्थापने टाकलेला हा कचरा म्हणजे कोळशाची राख असून वाऱ्यामुळे ही राख परिसरातील नागरिकांच्या नाकातोंडात जात असल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. फूड अँड ड्रग्ज कंझुमर वेलफेअर कमिटीचे खेड तालुका अध्यक्ष आशिष काते यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. रासायनिक कचऱ्याचे प्रदूषण करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपनी व्यवस्थापनवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडावे लागले असा इशारा काते यांनी दिला आहे.
पुष्कर कंपनीच्या युनिट ३ ने केलेल्या प्रदूषणाबाबत माध्यमांना माहिती देताना आशिष काते म्हणाले, गेले काही दिवस या परिसरातील नागरिकांना श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये खोकल्याचे प्रमाणही वाढले होते. नागिरकांना अचानक होऊ लागलेला श्वसनाचा त्रास आणि खोकला याचा शोध घेतला असता पुष्कर कंपनीच्या बाहेर कोळशाच्या पावडरचा ढीग आढळून आला.
वाऱ्यामुळे कोळशाची पावडर उडून परिसरातील नागिरकांच्या घरामध्ये जात आहे. ही पावडर नागरिकांच्या नाकातोंडातही जात असल्याने नागरिकांना श्वसनाच्या त्रासासह खोकल्याची त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांना तर या प्रदूषणाचा होणार त्रास न सांगण्यासारखा आहे.
उघडयावर फेकलेल्या कोळशाच्या पावडरमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा काते व त्यांच्या सहकार्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांना व्यवस्थापनाकडून योग्य ते सहकार्य मिळाले नाही.
अखेर काते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारांशी भेट घेऊन पुष्कर कंपनीच्या प्रदूषणाची तक्रार केली. महराष्ट्र प्रदूषण मंडळाने या तक्रारीची दखल घेत संबंधित कारखाना व्यवस्थापनावर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काते यांनी दिला आहे.