मध्यमवर्गीयांची आत्ममग्नता आणि मनातील प्रतिसादशून्यता भयावह- प्रा. मिलिंद जोशी
चिपळूण : महात्मा गांधीनी महाराष्ट्राला ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हटले होते. आज कार्यकर्ते शोधावे लागत आहेत. सामाजिक काम हे मध्यमवर्गीयांनी उभं केलेलं काम आहे. आज परिस्थिती बदलली आहे. समाजातील उच्चभ्रू वर्ग आपल्या स्टेटसच्या संकल्पना सांभाळण्यात मश्गुल आहे. समाजाच्या सामान्यस्तराचा जगण्याचा संघर्ष तीव्र आहे. अशावेळी समाजाचं संतुलन ठेवण्याचं काम हे पूर्वी मध्यमवर्गाने केलं होतं. पण आज आपण जे लिहितो, वाचतो, बोलतो, करतो याची दखल घेतली जात नाही. या भावनेतून मध्यमवर्गाच्या मनामध्ये निर्माण झालेली आत्ममग्नता आणि प्रतिसादशून्यता भयावह आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा पुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झालेली आहे. हे समाजासाठी घातक असल्याचे प्रतिपादन आद्य मराठी साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, नामवंत लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्र आयोजित
कवीवर्य द्वारकनाथ शेंडे पुरस्कार प्रदान सोहोळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, शेती व्यवसायातील प्रसिद्ध राजवाडी पॅटर्नचे प्रणेते, गेली चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, चूल, मुलं आणि करियर या त्रांगडात अडकलेल्या स्त्रीजीवनातील विविध प्रश्नांची उत्तरं आपल्या कथांमधून सांगणाऱ्या कथालेखिका सौ. नीला नातू, १६० वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते द्वारकानाथ शेंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना जोशी म्हणाले, पोटतिडीकीने बोलणाऱ्या नीला नातू मॅडम यांचे भाषण ऐकताना महाभारतातले एखादे कांड ऐकत आहोत असं वाटत होतं. दारूबंदी सारख्या विषयाला त्यांनी हात घातला. कोरोना काळात मद्यालये पहिली सुरु झाली. ग्रंथालये सुरु व्हावीत म्हणून आपल्याला मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं लागलं होतं अशी आठवणही त्यांनी सांगितली. त्यामुळे आपल्या समाजाला प्राधान्यक्रम कोणता ? मद्यालये की ग्रंथालये ? हे निश्चित करावं लागेल असं ते म्हणाले. सतिश कामत हे कृतीशील पत्रकार आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या कमतरतांवर बोट ठेवताना आपली जबाबदारी काय ? आपण काय करू शकतो ? याचा राजवाडी सारख्या ठिकाणी त्यांनी कृतीत उतरवलेला विचार महत्त्वाचा आहे. तो मोठ्या शहरात पोहोचला पाहिजे. त्यांच्या सोबत हा पुरस्कार तरुणाईने स्वीकारला हे अधिक महत्वाचं आहे. समर्थांच्या शब्दात सांगायचं तर, ‘मुलाचे चालीने चालावे। मुलांचे मनोगत बोलावे। तैसे जनास शिकवावे। हळूहळू।’ सामाजिक काम करताना समाज सोबत असायला हवा आहे. असं काम राजवाडीत सुरु असल्याबद्द्ल त्यांनी आनंद व्यक्त केला. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे दुष्काळ, नापिकी यांसोबत त्यांचा हरवलेला स्वाभिमान, नाकारलं गेलेलं माणूसपण, समाजाच्या इतर घटकांचं कोशात जगणंही कारणीभूत आहे. आज स्पर्धा आणि असूया प्रचंड वाढलेली आहे. सुख दु:खासह यशात आणि आनंदात सहभागी होतात ते खरे मित्र असं म्हणायला हवं आहे. चांगलं काम करणाऱ्यांबद्दल चांगलं बोलण्यासाठी माणसं लागतात. आज समाजाला त्यांचीही गरज आहे. समाजाला कर्ते सुधारक आणि ‘बोलते’ सुधारक आवश्यक आहेत. पूर्वीचे समाजाचे प्रश्न वेगळे होते. आज प्रश्नांचे स्वरूप बदललेले आहे. काळाने अधिक जटील प्रश्न आपल्यासमोर उभे केलेत. मातृ-पितृ-आचार्य देवो भव म्हणणारी संस्कृती असलेल्या आपल्या देशात आपल्याला मुलांनी आई-वडिलांना सांभाळावं म्हणून कायदे करावे लागतात. जागतिकीकरणानंतर आपल्याकडे आर्थिक समृद्धी आली. आर्थिक समृद्धीने मूल्यव्यवस्था बदलली. जगण्याचे प्राधान्य क्रम बदलले. पगाराचे आकडे वाढले. एकेकाळी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आज हातातलं घड्याळ, मोबाईल, गाडी, तुम्ही कोणत्या भागात राहाता ? यावरून माणसाची प्रतिष्ठा ठरते आहे. लोकमान्यांच्या आयुष्यामध्ये सत्वपरीक्षा पाहणारे जितके प्रसंग आले तितके या वाचनालयाच्या आयुष्यात आले. तरीही लोकमान्यांच्याच अभेद्य कार्यनिष्ठेने हे वाचनालय आजही कार्यरत आहे याचा अतिशय आनंद आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपला वेळ देणं ही जगात सर्वात कठीण गोष्ट आहे. वाचनालयाला असे कार्यकर्ते लाभलेत. प्रचंड यातायात करून असं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी आपुलकी आणि आस्था वाटत असल्याचे प्रा. जोशी म्हणाले.
जोशी यांच्याहस्ते ‘लक्ष्मी’ कथासंग्रहासाठी ‘मनबोली’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर सौ. नीला नातू यांनी आपल्या भाषणात उमरोली गावातील ‘दारूबंदी’ची कथा सांगितली. कोकणातील पाळीव सोमवार प्रथा, त्यानिमित्ताने महिलांचे केलेले एकत्रीकरण, १९९३-९४ सालचा दारूबंदीसाठीचा लढा, महिलांची भिशी सुरु करण्याची कल्पना, कोकणात महिलांसाठी काम करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी सांगितल्या. जोशी यांच्याहस्ते सामाजिक कार्यासाठी ‘गात जा अभंग’ पुरस्कार सतिश कामत यांच्यासह संतोष भडवळकर, सुहास लिंगायत, राजवैभव राऊत आणि सौरभ पांचाळ या तरूण शेतकऱ्यांनी स्वीकारला. यावेळी सतीश कामत यांनी बोलताना, ‘आपण फार मोठं काम केलेलं नाही. जमेल तेवढं जाताजाता करावं एवढ्याच हेतूने हे काम झालेलं आहे. कोकणात उद्यमशील माणूसही आहे’ असं सांगितलं. कोकणातील लोकांचे पाण्यामुळे अडते. कोकणात ब्राह्मण, मराठा आणि मुस्लीम वर्गाकडे पाणी आहे. शेती करणाऱ्या बहुसंख्य कुणबी लोकांकडेपाणी नाही. म्हणून अडचणी आहेत असं विदारक सत्य सर्वांसमोर मांडलं. आज सामाजिक कामांना निधी भरपूर मिळतो आहे. राजवाडीतही गरजेतून उपक्रमांची जुळवाजुळव करत काम उभं राहिलं आहे. आगामी काळात कृषी आणि पर्यावरणावर आधारित पर्यटन असा विषय राजवाडीत करावयाचा आहे. यातली आपली भूमिका ही मध्यस्थाची असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक आणि नामवंत कवी-पटकथा लेखक संजय पाटील यांच्या ‘हरविलेल्या कवितांची वही’ या काव्यसंग्रहासाठी वाचनालयाचा ‘मृदंगी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते समारंभाला अनुपस्थितीत होते. त्यांच्या कार्यक्रमाप्रति असलेल्या भावनांचा संदेश यावेळी ऐकवण्यात आला.
अंजली बर्वे यांनी पुरस्कार्थींचा परिचय करून दिला. द्वारकानाथ शेंडे यांच्याविषयी मनीषा दामले यांनी माहिती दिली. प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे यांना ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर आणि आभार मधुसूदन केतकर यांनी मानले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.