खेड : शहरातील एलपी इंग्लिश स्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या स्टार हॉलिडेज या दुकानाला शनिवारी दि. २२ रोजी रात्री ८ च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत या दुकानातील काही साहित्य जळून खाक झाले असून पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने आग नियंत्रणात आणली आहे. विनया चिखले यांच्या मालकीचे हे दुकान आहे. दुकान बंद करून गेल्यानंतर अचानक त्यांच्या दुकानातून धूर येऊ लागल्याने शेजारील व्यापाऱ्यांनी चिखले व पालिकेच्या अग्निशमन दलाला ही बाब कळवली. अग्निशमन दलातील शाम देवळेकर, गजानन जाधव, पियुष माने व अन्य जवानांनी आग नियंत्रणात आणली. आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.