8 दिवसांतच पोलिसांनी लावला घटनेचा छडा
डोक्यात वर्मी घाव घालून 3 वृद्ध महिलांना जाळण्याचा प्रयत्न
दापोली : कर्जबाजारी झाल्याने पैशांची गरज होती. या पैशाच्या विवंचनेतून तीन महिलांच्या डोक्यात वर्मी घाव घालून, अर्धवट जाळून ठार मारले आणि त्यांच्याकडील पैसे आणि दागिने चोरल्याची कबुली दापोली-वणौशी येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपीने पोलिसांना दिली आहे. रामचंद्र वामन शिंदे (वय 53, राहणार वणौशी तर्फे नातू, खोतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दापोलीमधील वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे मकर संक्रांतीच्या दिवशी तीन वृद्ध महिलांची एकाचवेळी हत्या करण्यात आली होती. केवळ आठ दिवसांत या खुनाचा छडा लावत पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. तिहेरी हत्याकांडामध्ये सत्यवती पाटणे (वय 75), पार्वती पाटणे ( वय 90) व इंदुबाई पाटणे (वय 85) या तीन महिलांचा संशयास्पद मुत्यू झाला होता. खून नेमका कशामुळे झाला याचा पोलिसांनी कसून तपास केला. घरातील दागिने गायब असल्याचे तपासादरम्यान आढळून आले होते. त्यांच्या अंगावरील रु. १,६२,१५०/- किमतीचे सोन्याचे दागिने व पैसे चोरीला गेले होते. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
पोलिस अधीक्षक यांनी गुन्ह्याचा तपास खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद यांच्याकडे सोपविला. गुन्ह्याचे घटनास्थळ हे कमी लोकवस्तीचे ग्रामीण भागातील असल्याने तसेच आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने तपास करणे आव्हानात्मक होते.
या घटनेचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, उपविभागीय पोलिस अधिकारी, डॉगस्कॉड आणि मोठा पोलिस फौजफाटा वणौशी गावात तळ ठोकून होता. गुन्ह्याचा उलगडा होण्याकरिता जिल्ह्यातील हुशार अधिकारी व अंमलदार यांची 5 पथके तयार करण्यात आली होती. अपर पोलीस अधीक्षक- रत्नागिरी १, पोलीस उपअधीक्षक-१, पोलीस निरीक्षक-१, सहा. पोलीस निरीक्षक ६, पोलीस उपनिरीक्षक-३ याप्रमाणे ५ पथके तयार केली व त्यांना घटनास्थळाच्या निरीक्षणापासून आरोपीचा शोध घेण्यापर्यंत वेगवेगळी कामे नेमून देण्यात आली होती. सदर पथकातील अधिकारी हे वणौशी खोतवाडी गावातील लोकांकडे कसून तपास करताना या वयोवृध्द महिला गावातील गरजू लोकांना पैसे देत असल्याने पोलिसांना समजले. त्यांच्याकडे पैशाची उपलब्धता असल्याचे झालेली घटना ही जाणकार व्यक्तीकडून झालेली असावी, हे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना व त्यांच्या टिमला जाणवले. त्यादृष्टीने तपासाचा गाव व आजूबाजूचे ओळखणारे लोक हा केंद्रबिंदू ठरविण्यात येऊन तपास पथकातील टीमला तशा सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने गावात व मयत यांच्या ओळखीच्या लोकांकडे तपास करण्यात सुरुवात केली असता घटनेशी निगडीत गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली. घटनेच्या अनुषंगाने काही संशयित हेरण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यामध्ये त्याच गावचा रहिवासी मात्र सध्या मुंबई येथे राहणारा रामचंद्र शिंदे याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. तपासादरम्यान रामचंद्र शिंदे याने प्रत्येक तपास पथकाला वेगवेगळी माहिती सांगितली. रामचंद्र शिंदे याच्या संशचित हालचाली पोलिसांनी टिपल्या होत्या. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.
पोलिस पथकाच्या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी रोख २५,०००/- रुपयांचे बक्षीस देऊन तपास पथकास सन्मानित केले.
