मार्लेश्वरसोबत साखरप्याच्या गिरीजादेवीचा रंगला विवाहसोहळा

0
42

देवरूख : मंगलाष्टकांच्या सुरात स्वयंभू श्री देव चि. मार्लेश्वर व साखरप्याची चि. सौ. कां. गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मार्लेश्वर शिखरावर मानकरी व पुजारी यांच्या मर्यादित उपस्थितीत शुक्रवारी दुपारी 2.45 वाजताच्या शुभमुहूर्तावर पार पडला. हा विवाहसोहळा कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने संपन्न झाला.
धार्मिक विधी कार्यक्रम रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुधारित आदेशानुसार व कोव्हिड नियमांचे पालन करून मानकरी व पुजारी यांच्या मर्यादित उपस्थितीत पार पडला. विवाहसोहळ्याच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी मार्लेश्वरची पालखी, गिरीजादेवीची पालखी व यजमान वाडेश्वराची पालखी या तिन्ही पालख्यांचे मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मोजक्याच मानकर्‍यांच्या उपस्थितीत आगमन झाल्यानंतर मुलाचे घर पाहणे, मुलगी पाहणे, मुलीची पसंती करणे, मुलीला मागणी टाकणे, पसंती, मानपान आदि. धार्मिक कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडले.
विवाहसोहळ्याला दुपारी प्रत्यक्षात प्रारंभ होण्यापूर्वी परंपरेप्रमाणे तब्बल 360 मानकर्‍यांना निमंत्रण देण्यात आले. लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून मंगलाष्टकांनी दुपारी 2.45 वाजताच्या शुभमुहूर्तावर हा सोहळा पार पडला.
गर्दी होऊ नये, यासाठी मारळ फाटा व मार्लेश्वर तीर्थक्षेत्री देवरूख पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here