महाराष्ट्र खो-खो संघात रत्नागिरीच्या राष्ट्रीय खेळाडू अपेक्षा सुतार आणि आरती कांबळे यांची वर्णी
रत्नागिरी, ता. 15 ः सोलापूर येथे झालेल्या 57 व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड खो-खो स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची घोषणा झाली असून त्यात रत्नागिरीच्या राष्ट्रीय खेळाडून अपेक्षा सुतार आणि आरती कांबळे यांची वर्णी लागली. तर पायल पवार हीची राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सत्कार करण्यात आला. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते, माजी उपनगराध्यक्ष बाळू साळवी, पत्रकार राजेंद्र चव्हाण, राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदिप तावडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद मयेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, प्रसाद सावंत, सचिन लिंगायत, सुरज आयरे, राजेश चव्हाण, राजेश कळंबटे, भाऊ पाल्ये यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आरती कांबळे, अपेक्षा सुतार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आरतीने आतापर्यंत सहा तर अपेक्षाकडे दहा राष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव आहे. ही स्पर्धा 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत जबलपूरला होणार आहे. तसेच ठाणे येथे त्यांचे सराव शिबीर होणार असून त्यासाठी रवाना झाल्या आहेत. याप्रसंगी श्री. तावडे म्हणाले, राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाने चमकदार कामगिरी केली. एक खेळाडू जखमी झाल्यामुळे उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली. उत्कृष्ट कामगिरी करणार्या अपेक्षा आणि आरतीची राज्याच्या निवड समितीला घ्यावी लागली. ते राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे नेतृत्त्व करणार असून सुवर्णपदक मिळवण्यासाठी निश्चितच मोलाची भुमिका बजावतील.
पुरुष संघ : सुयश गरगटे (कर्णधार), प्रतिक वाईकर, मिलिंद कुरपे, सागर लेंगरे (सर्व पुणे), ऋषिकेश मुर्चावडे, अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, हर्षद हातणकर (सर्व मु.उपनगर), अरुण गुणकी, सुरज लांडे (सर्व सांगली), गजानन शेगाळ (ठाणे), राहुल सावंत (सोलापूर), राखीव : लक्ष्मण गवस (ठाणे), अभिषेक पवार (अ. नगर), श्रेयस राउळ (मुंबई), प्रशिक्षक : बिपीन पाटील (मुंबई), व्यवस्थापक : सतीश कदम (सोलापूर).
महिला : प्रियांका इंगळे (कर्णधार), दिपाली राठोड, श्वेता वाघ, स्नेहल जाधव (सर्व पुणे), रुपाली बडे, रेश्मा राठोड, पूजा फरगडे (सर्व ठाणे), गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, जान्हवी पेठे (सर्व उस्मानाबाद), अपेक्षा सुतार, आरती कांबळे (सर्व रत्नागिरी), राखीव : अंकिता लोहार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी), संध्या सुरवसे (सोलापूर), प्रशिक्षक : महेश (मयूर) पालांडे (ठाणे), व्यवस्थापिका : नेहा तपस्वी (पुणे).
चौकट
ऐश्वर्याचा एअरपोर्ट संघात समावेश
रत्नागिरीची शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू ऐश्वर्या सावंत ही एअरपोर्ट या संघाकडून राष्ट्रीय स्पर्धा खेळणार आहे. देशातील प्रमुख खेळाडूंमध्ये ऐश्वर्याचे नाव घेतले जाते. गेली तिन वर्षे सलग ती एअरपोर्टकडून राष्ट्रीय स्पर्धा खेळत आहे.