पुस्तक-लेखक-वाचक-वाचनालय आणि कार्यकर्ता यांच्याशी एकरूप झालेल्या श्री. श्रीकृष्ण साबणे यांचे मन:पूर्वक अभिनंदन…
ॲड. धनंजय जगन्नाथ भावे. 9422052330
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाने श्रीकृष्ण साबणे यांना त्यांच्या कार्याबद्दल विशेष राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार आणि मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केल्याचे वाचले. खरोखरच आनंद झाला. आजकाल पुरस्कारांची खैरात आपण वाचत असतो. यातील काही पुरस्कारप्राप्त व्यक्तिंमुळे पुरस्काराचाच सन्मान होतो. श्रीकृष्ण साबणे यांना मिळालेल्या पुरस्काराचे असेच आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्या पुरस्काराचाच ख-या अर्थाने सन्मान झाला आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते कारण ग्रंथालय म्हणजे श्रीकृष्ण साबणे हे समीकरण बहुतांशी रत्नागिरी जिल्ह्यातील वाचनप्रेमीनी केव्हाच पक्के केलेले आहे.
मला नक्की आठवत नाही फार वर्षापूर्वी केव्हातरी श्रीकृष्ण साबणे यांची ओळख झाली. तेव्हा ते रत्नागिरीच्या शासकीय विभागीय ग्रंथालयामध्ये नोकरी करत होते. त्यानिमित्ताने मी आणि माझी पत्नी त्या ग्रंथालयामध्ये वाचनप्रेमी म्हणून अधून मधून जात होतो. मला सांगायला अभिमान वाटतो विविध प्रकारच्या वाचनाची आवड मला श्रीकृष्ण साबणे यानीच लावली. खरे तर माझ्या तत्कालीन लॅबोरेटरीच्या व्यवसायामध्ये मी वाचनापासून दूर झालो होतो. परिचय झाला त्यावेळी तसा श्रीकृष्ण साबणे याचा चेहरा चिंतामग्न वाटायचा. मृदु पण कमी बोलणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व. पण त्यांचेशी काय ऋणानुबंध होते कोणास ठाऊक, पण साबणे यांनीच शासकीय ग्रंथालयामधील विविध पुस्तकांचा आम्हाला ख-या अर्थाने परिचय करून दिला आणि त्यातूनच पुन्हा वाचनाकडे आम्ही आकर्षित झालो, वाचनाची आवड निर्माण झाली. त्या काळामध्ये शासकीय ग्रंथालयामधील पुस्तके केवळ ग्रंथालयालाच काही कालावधीसाठी दिली जात असत. केवळ काही सभासदांनाच ती व्यक्तिश: मिळत असत. परंतु साबणे यांनीच त्याही पुढे जाऊन ग्रंथालयाचे वरिष्ठांकडे आमचा परिचय करून दिला आणि महत्वाचे सभासदत्व दिले ज्यामध्ये काही दुर्मिळ पुस्तके घरी नेऊन वाचण्याची अधिकृत संधी त्यांनीच आम्हाला उपलब्ध करून दिली. पुस्तकांचे आणि साबणे यांचे नाते काही वेगळेच होते हे त्यावेळी आम्हाला जाणवले. आमची आवड पाहून बरेचदा तेच आम्हाला पुस्तके मुद्दामहून शोधून काढून वाचायला देत असत हे विशेष.एकाद्या विषयावरील पुस्तक हवे आहे असे सांगताच साबणे लागलीच त्या विषयासंदर्भातील किमान 4-5 पुस्तके आम्हाला काढून देत असत. विशेष म्हणजे त्याकाळामध्ये संगणक नव्हता पण साबणे यांचे पुस्तक-विषय-लेखक यांचेशी इतके जवळचे नाते होते की त्याकाळामध्ये ते पुस्तक-विषय-लेखक याचा चालता बोलता संगणकच होते म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शासकीय सेवेनंतरही पुस्तक विक्रीचा व्यवसाय त्यांनी स्वीकारला आणि त्याचबरोबर ते वास्तव्य करून असलेल्या कर्ला गावातील वाचनालयाच्या निर्मितीमध्ये मोलाचा वाटा उचलून तेथील नागरिकांना वाचते केले हे विशेष. खरे तर कोणतेही आर्थिक पाठबळ नाही, कोणीही गॉडफादर नाही स्वत:चीही तशी फारशी ओळख-पाळख नाही परंतु असे असतांनाही साबणे यानी ग्रंथालय चळवळीचा वसा घेतला आणि तो यशस्वीही केला. त्यानंतरही सध्या कै. कुसुमताई अभ्यंकर वाचनालयाचे ते प्रमुख असून जिल्हा ग्रंथालय संघाचे ते पदाधिकारी आहेत. या माध्यमातून त्यांनी वाचन संस्कृती आणि चळवळ जागृत ठेवली आहेच. संगणक युग, गुगल इत्यादिच्या युगामध्ये वाचन संस्कृती आणि चळवळ जागृत ठेवणे ग्रंथालयाच्या आणि त्यामध्ये काम करणा-या व्यक्तिंच्या सर्वंकष प्रगतीसाठी कार्यरत रहाणे हे फारच कठीण काम आहे. तरीही श्रीकृष्ण साबणे यानी निरलसपणे विश्वासाने हे कार्य चालू ठेवले आहे हे विशेष आहे. त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे हेच वैशिष्ट्य आहे असे मला वाटते. पुन्हा एकदा श्रीकृष्ण साबणे यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये शुभेच्छा.