वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणकरांनी सुरू केलेल्या लढ्याला मोठे यश
वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणकरांनी सुरू केलेल्या लढ्याला मोठे यश आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईतील बैठकीत दीड तास चर्चेअंती चिपळूणवासीयांची मागणी मान्य केली.बुधवारी (ता. १५) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अल्प आणि दीर्घकाळ अशा दोन टप्प्यात वाशिष्ठीतील गाळ काढण्याच्या निर्णयावर सर्व मंत्र्यांनी बैठकीत शिक्कामोर्तब केले असून त्याला बुधवारी मूर्त स्वरूप मिळणार आहे.
चिपळूण बचाव समिती आणि समस्त चिपळूणवासीयांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत महसूलमंत्री थोरात यांनी बैठक घेतली. ते म्हणाले, ”गाळ काढावाच लागेल हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महसूलचा विषय असेल तो निश्चितपणे युद्धपातळीवर हाताळला जाईल. जुवाडे, बेटे ताब्यात घेऊन ती काढून टाकण्याची कार्यवाही त्वरित करू.” वेळ फार कमी आहे. त्यामुळे तातडीने या कामाला सुरुवात झाली पाहिजे, असे सांगत गाळ काढण्याला पूर्णतः मान्यता दिली.
वाशिष्ठीतील गाळ काढणे या विषयावर सर्वांचे एकमत झाल्यानंतर बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीच्या पूर्वी पुन्हा सर्व संबंधित मंत्री व अधिकारी एकत्र बसून प्रस्ताव तयार करतील व अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटसमोर ठेवून निर्णय घेतला जाईल, असे ठाम आश्वासन चिपळूण बचाव समितीला यावेळी देण्यात आले. त्यावर तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असून शासनाकडून लेखी ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका चिपळूण बचाव समितीतर्फे अरुण भोजने, शहनवाज शहा, राजेश वाजे, सतीश कदम व किशोर रेडीज यांनी मांडली.
www.konkantoday.com