
साडेसात लाखांचा गुटखा गाडीतून नेणार्या दोघांना पोलिस कोठडी; वाहनही जप्त
तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची बेकायदेशिपणे वाहतूक करणार्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली. गुरुवारी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत केली.
संशयितांकडून सुमारे 7 लाख 50 हजार 400 रुपयांचे प्रतिबंधित पदार्थ आणि 4 लाख 50 हजारांची टाटा इन्ट्रा गाडी असा एकूण 12 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 8 रोजी रात्री 10.30 वा.चांदसूर्या बसस्टॉपजवळ करण्यात आली. प्रशांत उर्फ बाबाजी विजय नाईक (38), सुंदर लक्ष्मण कुबल (42, दोन्ही रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक बुधवारी रात्री खेडशी ते हातखंबा अशी गस्त घालत होते. तेव्हा त्यांना चांदसूर्या बसस्टॉपजवळून जाणारे टाटा इन्ट्रा (एमएच-07-एजे-1906) वाहन संशयित वाटले. त्याची तपासणी केली असता वाहनामध्ये विमल पान मसाल्याची 15 पोती इतर तंबाखूची पॅकेट आणि सिगारेटचे 33 बॉक्स असा शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल मिळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
www.konkantoday.com