छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर मांडणे हे महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे ईश्वरी कार्य- ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे
रत्नागिरी- सतत वाचन, आनंदी, सकारात्मक दृष्टीकोन यामुळेच बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर मांडण्याचे ईश्वरी कार्य केले. आयुष्यभर प्रवास करून दिलेल्या व्याख्यानातून मिळालेला पैसा बाबासाहेबांनी शिवप्रतिष्ठानकडे सुपूर्द केला. आंबेगाव – पुणे येथे २१ एकर जमिनीवर भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी, हे बाबासाहेबांनी आयुष्यभर उराशी बाळगलेले एक स्वप्न आहे. शिवचरित्र समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य तुम्हा आम्हा सर्वांचे आहे, या कार्यातूनच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहूया, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ विलास पाटणे यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आज सायंकाळी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. या वेळी इतिहास अभ्यासक, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय सेवा समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदींसह हिंदुत्ववादी संघटनांसह समाजातील विविध स्तरांतील लोक उपस्थित होते.
अॅड. पाटणे म्हणाले की, सन १९७३ च्या दरम्यान शिवचरित्र व्याख्यानमालेच्या निमित्ताने बाबासाहेबांची पहिली भेट झाली. लाघवी स्वभाव आणि वागण्यात कौटुंबिक जिव्हाळा प्रत्ययास आला. व्याख्यानमालेबरोबर अनेक गड बाबासाहेबांच्या बरोबर पाहण्याचा योग आला. साधासरळ माणूस, वागण्यात व शिष्टाचारात संस्थानी रितीरिवाज. समोरच्या माणसाशी भेट संवाद साधणारी प्रेमळ भाषा. व्यक्तिमत्वात भारदस्तपणा आणि त्यामागे लपलेला निरागसपणा भावून गेला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुण्यात त्यांची भेट घेतली. रामशास्त्री पुस्तकाचं कौतुक करून त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. व्यक्ती लहान असो व मोठी ते अहोजाहो करायचे.
प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सांगितले की, खातू नाटय मंदिरात झालेल्या व्याख्यानावेळी बाबासाहेब म्हणाले होते की, ज्याला दिलेली वेळ पाळता येत नाही तो भ्रष्टाचार असे म्हणाले होते.
माजी आमदार बाळ माने म्हणाले, लहानपणी मी बाबासाहेबांची व्याख्याने ऐकली. तेव्हापासून राष्ट्रभक्ती, देशप्रेम आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रचंड आदर निर्माण झाला.
राजीव लिमये म्हणाले की, माझे बालपण भारून टाकले ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या महिला विद्यालयात झालेल्या चरित्र कथनाने. सुमारे 50 वर्षांपूर्वी त्यांची व्याख्याने 9 दिवस सुरू होती. त्यामुळे इतिहासाचा आयुष्याला खरा स्पर्श झाला. इतिहासाचे मूलगामी कार्य केले. इंग्रजांनी इतिहास पुसण्याचे काम केले होते. पण खरा इतिहास समोर आणण्याचे कार्य केले.
मंदार गाडगीळ यांनी सांगितले, बाबासाहेबांच्या कार्याने भारलो आहे. त्यांनी लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्यास घेतला होता, त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. जाणता राजा या नाट्याने इतिहास रचला. आमची पिढी सांगेल की, आम्ही शिवचरित्र बाबासाहेबांकडून ऐकले.
अॅड. रुची महाजनी यांनी सांगितले की, खातू नाट्यमंदिरात आम्ही बाबासाहेब यांची व्याख्याने ऐकली आणि डोळ्यासमोर इतिहास उभा राहिला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या आयुष्यातील अनेक व्यक्तिरेखा दिसल्या. अफझलखान वध, जिजाऊ, डोळ्यांनी पाहिले.
सचिन वहाळकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावेळी नतद्रष्ट मंडळीनी याचिका केली, तेव्हा न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दंड ठोठावला होता. मृत्यूनंतरही त्यांची निंदानालस्ती केली जात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर राजा शिवछत्रपतींचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे.
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रवीण जोशी म्हणाले की, 1969 मध्ये महिला विद्यालयात 9 दिवस व्याखानमाला झाली. तेव्हा दररोज 2 हजार लोक यायचे. आईवडील व आम्ही 3 भावंडे जात होतो. बरेच जण पालकांसोबत येत होते. तेव्हा मी १२ वर्षांचा होतो. मी डॉ. अजित जोग याने छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळ्याचे गीत म्हटले होते, ते आजही स्मरणात आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी तयारी करून घेतली होती. देशासाठी जगले पाहिजे, हा महाराजांचा विचार आम्ही शिकलो आणि याच भावनेतून कार्य केले पाहिजे. नंतर गो. नी. दांडेकर व बाबासाहेबांचे रायगडावरील पुस्तक पाहून सर्व मित्रमंडळी रायगड पाहायला गेलो व महाराजांच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला.
अभाविपच्या माजी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन झेप क्षितीजापलिकडे ग्रुप स्थापन केला आणि बाबासाहेबांची व्याख्याने आयोजित केली. दररोज गर्दी वाढत गेली. नंतरनंतर लोक उभे राहूनही ऐकत होते. बाबासाहेबांच्या निधनाची बातमी ऐकून जुन्या आठवणी तरळल्या. त्यांचा सत्कार करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली होती. त्यांच्या स्पर्शाने मी पावन झालो, असे भावनिक उद्गार विश्वास वाडेकर यांनी काढले.
संतोष पावरी म्हणाले की, रत्नागिरीत झालेल्या जाणता राजा नाट्याच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला. शतायुषी ऋषींना मुकलो. बाबासाहेब संघस्वयंसेवक होते. या शतकातील या महान व्यक्तीचे कार्य आपण पुढे नेऊया. कौस्तुभ सावंत यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. सचिन रेमणे यांनी आभार मानले.