जागतिक पर्यटन दिन विशेषकोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाचे विविध प्रयत्न – उपायुक्त मनोज रानडे

कोकण विभागात कृषी पर्यटनाला मोठी संधी असून 40 कृषी पर्यटन केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून पर्यटकांसाठी खूली केली आहेत. त्या माध्यमातून कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल, असे कोकण विभागीय उपायुक्त श्री.मनोज रानडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालनालयाच्या अधिनस्त असलेले उपसंचालक (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई यांच्यवतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत श्री.हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन), डॉ.गणेश मुळे उपसंचालक (माहिती), डी.एन.राठोड वनक्षेत्रपाल कर्नाळा पक्षी अभयारण्य, श्री.संजय नाईक निसर्ग हॉस्पिटॅलिटीचे संचालक, तसेच पत्रकार उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त (सामान्य) श्री.रानडे यांनी उपस्थित पत्रकारांना जागतिक पर्यटन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच दि.2 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर दरम्यान फणसाड, कर्नाळा अभयारण्य जंगल ट्रेल (Jungal Trail) लिफलेटचे प्रकाशन करण्यात आले.
सन 1980 पासून दरवर्षी 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. विशेषत: कोकणाला पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य सर्व समावेशक वाढीसाठी पर्यटन असे आहे. या घोषवाक्याला अनुसरुन प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, नवी मुंबई यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
कोकण विभागातील कृषी उद्योजक, हॉटेल, रिसोर्ट उद्योजक यांना पर्यटन संचालनालयाकडे असलेल्या योजनांचा फायदा घेऊन पर्यटन व्यवसायात एक उत्साहाचे वातारण निर्माण करण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्यटन संचालनालय प्रादेशिक पर्यटन कार्यालय कोकण विभाग यांच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फणसाड वन्यजीव अभयारण्य व कर्नाळा पक्षी अभयारण्याची जंगल ट्रेल (Jungal Trail) अशी एकदिवशीय सहल दि.2 ऑक्टोंबर ते दि.8 ऑक्टोंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. निसर्ग हॉस्पिटॅलिटीचे संचालक श्री.संजय नाईक हे या सहलीचे आयोजन करणार आहेत. यानिमित्ताने स्थानिक पर्यटन विकासात हातभार लागेल. स्थानिक आणि गाईड यांना रोजगार उपलब्ध होईल. याच काळात वन्यजीव सप्ताह असल्याने पर्यटकांना वन्यजीव वन विभाग यांच्याकडून माहिती मिळेल. त्यामुळे वन्यजीव संवर्धनाचे या उपक्रमाला वन विभागाचा सक्रीय सहभाग राहणार आहे.
कोकणातील समुद्र किनाऱ्यालगत शासकीय व खाजगी जमिनीवर आरामखुर्च्या आणि मोठया छत्र्यांसह तात्पुरत्या हंगामी चौपाटी कुट्या (बीच शॅक), सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्र, उभारण्यासाठीचे “बीच पर्यटन धोरण” यामध्ये प्रथम रत्नागिरी जिल्हयातील गुहागर आणि आरेवारे समुद्रकिनारा, सिंधुदूर्ग जिल्हयातील कुणकेश्वर आणि तारकर्ली समुद्र किनारा, रायगड जिल्हयातील वर्सोली आणि दिवे आगार समुद्र किनारा, पालघर जिल्हयातील केळवा आणि बोर्डी समुद्र किनारा येथे बीच शॅक धोरण राबविण्यात येणार आहे.

राज्यातील पर्यटन विकास अधिक सक्षम व्हावा म्हणून पर्यटन विभागाअंतर्गत पर्यटन संचालनालयाची निर्मिती करण्यात आली असून एप्रिल 2019 पासून राज्यातील प्रत्येक महसूली विभागात प्रादेशिक कार्यालय उभारण्यात आले आहे. कोकण विभागाचे प्रादेशिक कार्यालय कोकण भवन 7 वा मजला सीबीडी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी नुकतेच कार्यरत झाले आहे. या‍ विभागात कोकणातील 7 जिल्हयांचे समायोजन करण्यात आलेआहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button