आंबा फवारणीच्या औषधाने नशा करणाऱ्या तीन नेपाळी गुरख्यांनी अवघ्या चार तासात गमावला जीव ,राजापूर तालुक्यातील जैतापूर- दळे येथील प्रकार

राजापूर:- तालुक्यातील जैतापूर- दळे येथे आंबा बागेत काम करणाऱ्या तीन गुरख्यांना नशेपायी अवघ्या चार तासात जीव गमवावा लागला आहे. आंबा फवारणीसाठी वापरण्यात येत असलेल्या औषधाचा त्या तिघांनी नशा येण्यासाठी वापर केल्याने एकाच दिवशी संशयास्पद मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
अवघ्या चार तासात पाठोपाठ तीन तरूण गुरख्यांचा मृत्यु झाल्याने अनेक तर्क वितर्क बांधले जात होते. दरम्यान या तिघांनीही नशा येण्यासाठी पाण्यामध्ये जीओ सॉलव्हंट हे औषध मिसळुन पित असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. आंबा फवारणीमध्ये आंब्याचा आकार वाढीसाठी जीओ सॉलव्हंट औषध वापरले जाते. त्याचा जादा डोस झाल्याने विषबाधा होऊन या तिघांचाही मृत्यु झाल्याची माहिती नाटे सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनीदिली.
गोविंद श्रेष्ठा (वय ३२), दिपराज पुर्णनाम सोप (वय ३९, रा. दळे जैतापूर), निर्मलकुमार ऐनबहाद्दुर ठाकूरी (वय ३८ ) अशी मयत गुरख्यांची नावे आहेत. पहिल्या दोघांचा जिल्हा रुग्णालयात तर तिसऱ्याचा धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यु झाला. रविवारी रात्री ९ ते १ या चार तासात पाठोपाठ या तीनही गुरख्यांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर तात्काळ जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागिय पोलिस अधिकारी निवास साळोखे, राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे.
राजापूर तालुक्यातील दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत हे तिन्ही नेपाळी कामगार काम करीत होते. रविवारी रात्री त्यांचा अकस्मिक मृत्यू झाला. तशी माहिती नाटे पोलीसांना देण्यात आली. निर्मलकुमार ऐनबहाद्दुर ठाकूरी हा रविवारी कामानिमित्त रत्नागिरीत गेला होता. दुपारनंतर तो दळे येथे बागेत परतला. मात्र त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नाटे येथील एका खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथून त्यांनी त्याला अधिक उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथेच त्याचा मृत्यु झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान निर्मलकुमार ऐनबहाद्दुर ठाकूरी याच्यासोबत रहाणाऱ्या त्याच्या गोविंद व दीपक या आणखी दोन सहकाऱ्याची प्रकृती अचानक बिघाडल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात हलविण्यात आले. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. पोलिसांनी तात्काळ चौकशीची चक्रे हलवून या तिघांचा मृत्यु नेमका कशाने झाला याचा शोध लावला. आंबा बागायतदारांकडून आंबा फवारणी करताना आंब्याचा आकार वाढावा, यासाठी जीओ सॉलव्हंट औषध वापरले जाते. काझी यांच्या बागेतही गोदामात हे औषध होते. नशेसाठी या तिघांनीही पाण्यातुन हे औषध घेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यातून विषबाधा होऊन या तिघांचा मृत्यु झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button